(खेड / रत्नागिरी प्रतिनिधी)
आगामी खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चढू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची औपचारिक भूमिका अद्याप निश्चित झालेली नसली तरी सर्व पक्षांनी आपापल्या पातळीवर तयारीचा बिगुल वाजवला आहे. यावेळी नगराध्यक्षपद महिला आरक्षित असल्याने कोणत्या पक्षाच्या महिला उमेदवाराला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात होत असल्याने स्थानिक सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत १७ नगरसेवकांची नगरपरिषद असताना यावेळी तीन जागांची वाढ करण्यात आली आहे. नव्या आराखड्यानुसार शहरात १० प्रभागांमधून २० नगरसेवक नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २०१६ च्या निवडणुकीत शिवसेनेने १० नगरसेवकांसह वर्चस्व मिळवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तर मनसेचे ४ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, थेट झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले मनसेचे वैभव खेडेकर यांनी शिवसेनेच्या उमेदवार बिपीन पाटणे यांचा पराभव करून अनपेक्षित विजय मिळवला होता.
दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडखोरीनंतर बाळा खेडेकर विरुद्ध सुनील दरेकर यांच्या स्पर्धेत, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या ‘कास्टिंग व्होट’ मुळे सुनील दरेकर यांनी विजय मिळवला होता. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत एकत्र लढण्याचा की स्वबळावर लढण्याचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही जागावाटपाविषयी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. तथापि, स्थानिक पातळीवर आप, मनसे आणि इतर लघुपक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. महिला आरक्षणामुळे या वेळी निवडणूक अधिक रंजक होणार असून, सत्तांतराच्या समीकरणांबरोबरच पक्षांतर्गत गोटबाजी आणि नव्या चेहऱ्यांच्या दावेदारांमुळे खेड नगरपरिषदेची निवडणूक एक हायव्होल्टेज राजकीय सामना ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

