(खेड)
खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे राहणाऱ्या सोहम मंगेश शिर्के या विद्यार्थ्याचा विंचूच्या दंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे घडली. गावात आणि परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
११ जून रोजी रात्रीच्या सुमारास सोहमला विंचूने दंश केला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर होत गेल्याने त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाही शुक्रवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. सोहम शिर्के याने नुकतीच तळे हायस्कूलमधून दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली होती. उज्ज्वल भविष्य उंबरठ्यावर असतानाच आलेल्या या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी त्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.