(सावंतवाडी)
कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात आवाज उठू लागला आहे. “हा महामार्ग सर्वसामान्य माणूस, शेतकरी आणि बागायतदारांसाठी नव्हे, तर केवळ मोठ्या भांडवलदार आणि खनिज वाहतूकदारांच्या फायद्यासाठी रचलेला प्रकल्प आहे,” असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गामुळे निसर्ग सौंदर्य आणि खनिज संपत्तीचे मोठे नुकसान होणार असल्याचा इशारा देत शेट्टी यांनी जाहीर केले की, महामार्गाच्या नावाखाली होणारे उत्खनन आम्ही कदापि सहन करणार नाही. ते सिंधुदुर्ग शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वैचारिक मेळाव्यात बोलत होते. या वेळी माजी आमदार वैभव नाईक, राज्य समन्वयक समितीचे गिरीश फोंडे, कॉम्रेड संपत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, सतीश लळीत, माजी सभापती भगवान देसाई, इर्शाद शेख, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, प्रकाश पाटील, नितीन पाटील, संदीप सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, विद्याप्रसाद बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे आजही अपूर्ण आहेत. मग कोकणच्या विकासासाठी आणखी एका महामार्गाची काय गरज? हा महामार्ग म्हणजे निसर्ग आणि खनिज संपत्तीवर डोळा ठेवून राबवला जाणारा प्रकल्प आहे. सरकार केवळ धार्मिक भावनांना खतपाणी घालून लोकांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले, या प्रकल्पाचा खर्च तब्बल ८६ हजार कोटींवर नेऊन पुढील निवडणुकांपूर्वी मतदारांना आर्थिक लाभ देण्याची तयारी सुरू आहे, असा संशय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या महामार्गामागील आर्थिक फायद्याचे गणित ठाऊक आहे. पण आम्ही ते उघड करून दाखवू. जसे बाजीप्रभूंनी पावनखिंड लढवली, तसे कोकणातील शेतकरीही या महामार्गाविरोधात आपली ‘पावनखिंड’ लढवतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या “काही भाग वगळले जाऊ शकतात” या वक्तव्यावर टीका करत शेट्टी म्हणाले, “जर त्यांना काही भाग वगळायचे असतील तर त्यांनी थेट कर्नाटकात जावे. कोकणातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.” तसेच आमदार दीपक केसरकर यांनी हा रस्ता रेडी बंदराला जोडण्याबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले, केसरकरांना नागपूरला जायचे असेल, तर आधी कोल्हापूरला यावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले की, हा महामार्ग इको सेन्सिटिव्ह झोनमधून जात असल्याने निसर्ग सौंदर्य, पाण्याचे झरे आणि खनिज संपत्तीवर गंभीर परिणाम होईल. माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्गविरोधी जनआंदोलनाला आपला ठाम पाठिंबा जाहीर केला.
कॉम्रेड संपत देसाई आणि इतर वक्त्यांनी देखील जनतेला आवाहन केले की, कोकणच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गरक्षणासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. हा लढा केवळ रस्त्याचा नसून, कोकणाच्या भविष्याचा आहे. सभेच्या शेवटी ‘शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली असून, पुढील काळात आंदोलनाला जिल्हास्तरावर गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

