(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील नगर परिषदा, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार इच्छुकांकडून प्रभाग, गण तसेच गट पातळीवर कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वत्र जनसंपर्क मोहिमेला जोरदार सुरुवात झाली आहे.
प्रभागातील सर्वसामान्य मतदारांपासून प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत संपर्क साधत, आपली ओळख आणि कामगिरी ठळक करण्याच्या प्रयत्नात प्रत्येक इच्छुक व्यस्त झाला आहे. अनेक ठिकाणी आरक्षण फेरबदलामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असून, संभाव्य उमेदवारांनी निवडणूकपूर्वच रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यावेळी अनेकांनी स्वतःऐवजी कुटुंबातील सदस्यांना पत्नी, मुलगा, सून किंवा जवळचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये स्पर्धा अधिकच चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षांतरे आणि अंतर्गत घडामोडी
दरम्यान, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसमोर उमेदवारांच्या अपेक्षांची पूर्तता ही डोकेदुखी ठरत आहे. पक्ष प्रवेशावेळी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी करायची, या प्रश्नाने नेतृत्वही गोंधळात सापडले आहे. इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान प्रत्येक पक्षासमोर उभे आहे. उमेदवारी न मिळाल्यास काही जण पुन्हा पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये “पक्षांतरांचे ग्रहण” सर्वच पक्षांना लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. एकूणच, रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत असून, उमेदवारांच्या हालचालींनी जिल्ह्यातील राजकारणाचा तापमानपारा आणखी वाढला आहे.

