( देवरुख / प्रतिनिधी )
अभिरुची देवरुख आयोजित “स्वरोत्सव” हा वार्षिक संगीत महोत्सव “स्वरोत्सव २०२६” या नावाने दि. ९ ते ११ जानेवारी २०२६ या काळात मधली आळी देवरुख येथील पित्रे प्रायोगिक कलामंच येथे रोज रात्री ९:३० वाजता सादर होणार आहे. अभिजात संगीताने नटलेल्या या महोत्सवात आजवर शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन, वाद्य वादन, तसेच कथ्थक-नृत्य आणि संगीत नाटकाचाही समावेश करण्यात आला आहे. अभिरुची आयोजित “स्वरोत्सव” या महोत्सवाचे यंदा २१ वे वर्ष असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या वर्षीचा “स्वरोत्सव” दर्जेदार कलाकारांच्या कार्यक्रमांनी सजणार आहे.
प्रथम पुष्प – शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२६ – रोजी ग्वाल्हेर, पतियाळा तसेच किराणा घराण्याची गायकी आत्मसात केलेले सुप्रसिद्ध गायक आणि पं. व्यंकटेश कुमार यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना हार्मोनियम वर सुयोग कुंडलकर यांची असेल तर तबलासाथ भरत कामत यांची असेल.
द्वितीय पुष्प – शनिवार दि. १० जानेवारी २०२६ – रोजी पं. विद्युत मिश्रा यांचे पट्ट शिष्य असलेले सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री. मनास कुमार यांच्या व्हायोलिन वादनाची मैफल होईल. त्याला श्री. तनय रेगे यांच्या तबला साथीने रंग भरेल.
तृतीय पुष्प – रविवार दि. ११ जानेवारी २०२६ – रोजी तपस्या या सावंतवाडी येथील संगीत – नाट्य कालांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या संस्थेच्या कलाकारांनी साकारलेले कै. चि . य. मराठे लिखित आणि पं. भालचंद्र पेंढारकर यांचे मूळ संगीत असलेले, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, जयंत सावरकर, माया जाधव यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेले “होनाजी बाळा” हे संगीत नाटक सादर होईल.
स्वरोत्सव २०२६ च्या आरंभी आपली कला सादर करायला येणारे ग्वाल्हेर, पतियाळा तसेच किराणा घराण्याची गायकी आत्मसात केलेले पं. व्यंकटेश कुमार हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील आजचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक आहेत. स्वामी हरिदास आणि कनकदास यांनी रचलेल्या भक्तीगीतांच्या सादरीकरणासाठी ते विशेष ओळखले जातात. पं. व्यंकटेश कुमार यांना तबला साथ करणारे भरत कामत हे बनारस तबला घराण्या च्या परंपरेतील तबला वादक आहेत.पं. व्यंकटेश कुमार यांना हार्मोनियम साथ करणारे सुयोग कुंडलकर सध्या पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रामध्ये गुरू म्हणून ज्ञानदानाचे काम करतात.अशा या नामवंत, गुणवंत कलावंतांच्या कलाविष्काराने या वर्षीच्या स्वरोत्सवाची सुरुवात दमदार होणार यात शंकाच नाही.
स्वरोत्सवचे दुसरे पुष्प गुंफणारे कलाकार मानस कुमार, तरुण पीढीतील आघाडीचे व्हायोलिन वादक आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय व्हायोलिन वादना बरोबरच त्यांनी फ्युजन संगीतासाठीही काम केले आहे. त्यांच्या व्हायोलिन वादनासाठी त्यांना मुंबई आकाशवाणी कडून ‘ए’ ग्रेड मिळालेली आहे. तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत. मानसकुमार यांच्याबरोबर तबला संगत करणारे तनय रेगे हे मुंबईचे एक उदयोन्मुख भारतीय शास्त्रीय तबला वादक आणि शिक्षक आहेत, मानस कुमार यांचे व्हायोलिन वादन आणि त्याला तनय रेगे यांची तबला संगत ही देवरुखच्या रसिकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.
या वर्षीच्या स्वरोत्सवाची सांगता “होनाजी बाळा” या कै. चि . य. मराठे लिखित आणि पं. भालचंद्र पेंढारकर यांचे मूळ संगीत असलेले, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, जयंत सावरकर, माया जाधव यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेल्या संगीत नाटकाने होणार आहे. सावंतवाडीच्या तपस्या या संगीत – नाट्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या संस्थेचे गुणी आणि यशस्वी कलाकार हा नाट्याविष्कार सादर करणार आहेत. विशेषत: तरुण पिढीतील आश्वासक गायक नट आणि दर्जेदार संगीत साथ यांनी युक्त असा हा नाट्य प्रयोग स्वरोत्सव मालिकेतील सहावा नाट्य प्रयोग असणार आहे.
अभिरुची आयोजित स्वरोत्सव मालिकेत या यापूर्वी सादर झालेल्या दर्जेदार नाटकांमध्ये प्रीतीसंगम, ययाती आणि देवयानी, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, संशयकल्लोळ अशा दर्जेदार संगीत नाटकांचाही समावेश आहे. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या वर्षीच्या स्वरोत्सवातही त्याची पुनरावृत्ती साधण्याचा अभिरुचीचा मानस आहे. वरील सर्व कार्यक्रम सर्व संगीत-नाट्य रसिकांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी, विविध स्तरातून अभिरुचीला सहकार्य मिळत आहे. कलाप्रेमी रसिकांच्या वैयक्तिक सहाय्या बरोबरच व्यापारी वर्ग, कारखानदार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाही यात पुढाकार घेत असल्याने हे अशा प्रकारचा संगीत महोत्सव “आपलं देवरुख सुंदर देवरुख” सारख्या सुंदर कला-क्रीडा-संस्कृतीउपासक नगरीत सादर करता येणे हे अभिरुचीचे भाग्य असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई यांनी सांगितले. सर्व क्षेत्रातील रसिकांच्या आशिर्वादाने रसिकमान्यता मिळविलेल्या या वार्षिकोत्सवाच्या २१ व्या वर्षी सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे आणि या स्वर-पर्जन्यात नाहून निघावे असे आवाहन अभिरुची तर्फे करण्यात येत आहे.

