(रत्नागिरी)
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासादरम्यान बहुतेक प्रवासी खालच्या बर्थची (लोअर बर्थ) इच्छा व्यक्त करतात. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक तिकीट बुक करताना हा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नेहमीच त्यांना इच्छित जागा मिळत नाही. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने आता ‘लोअर बर्थ’ बुकिंगसंदर्भात महत्त्वाचे बदल केले आहेत.
आसन आरक्षणासाठी नवीन नियम
भारतीय रेल्वेने आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केला आहे. या बदलानंतरही लोअर बर्थबाबत प्रवाशांच्या तक्रारी कायम होत्या. त्यामुळे आता रेल्वेने बुकिंग प्रणालीमध्ये एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
आता IRCTC वरून तिकीट बुक करताना प्रवाशांना “लोअर बर्थ उपलब्ध असेल तरच बुक करा” हा पर्याय निवडता येईल.
याचा अर्थ — जर खालचा बर्थ उपलब्ध असेल तरच तुमचे तिकीट निश्चित होईल. लोअर बर्थ उपलब्ध नसल्यास बुकिंग प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार, ४५ वर्षांवरील महिला, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ देण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, हे जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
ट्रेनमध्ये झोपण्याचे वेळापत्रक
रेल्वेने झोपण्याबाबतचे नियमदेखील स्पष्ट केले आहेत.
- प्रवासी रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत त्यांच्या नियुक्त बर्थवर झोपू शकतात.
- दिवसा, विशेषतः मधल्या बर्थवर (Middle Berth), झोपण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- या वेळेत प्रवाशांनी आपापल्या जागा बसण्यासाठी खुल्या ठेवाव्यात.

