(साखरपा / दिपक कांबळे)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बस थांब्यावरील प्रवासी मार्ग निवारा शेडची दुरवस्था झाली असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेडचे पत्रे नुकतेच वादळी वाऱ्याने उडून काही प्रवाशांवर पडले. सुदैवाने किरकोळ दुखापती वगळता मोठा अनर्थ टळला.
दाभोळे येथून रत्नागिरी-कोल्हापूर सावंतवाडी गोवा व मुंबई अशा विविध ठिकाणी जाण्या येण्यासाठी प्रवासी प्रवास करीत असतात अर्थातच या बस थांब्यावर प्रवाशांचा फार मोठा चढ उतार नियमित पाहावयास मिळतो. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी मार्ग निवारा शेड अतिशय दुबळी असल्याने प्रवासी वर्गातून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित व उदासीनतेमुळे या शेडची दुरवस्था झाली आहे अशी चर्चा आता सर्वत्र चालू आहे. या शेडसंबंधी राजापूर-लांजा-साखरपा या विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांचे लक्ष वेधण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्याचे समजते.

