(संगमेश्वर)
नावडी गावाची कुलदेवता आणि ग्रामदैवत असलेल्या श्री निनावी देवीसह विठलाई, वाघजाई, वरदानी, मानाई यांचे मंदिर नावडी (ता. संगमेश्वर) येथे नव्याने उभारण्यात आले असून, त्याचा जीर्णोद्धार सोहळा २८, २९, ३० एप्रिल २०२५ रोजी उत्साही आणि भव्य वातावरणात साजरा होणार आहे.
या मंदिराची मूळ स्थापना १९६४ साली भंडारी, नाभिक, तेली इत्यादी ज्ञातीबंधू, तसेच मित्रमंडळाच्या सहकार्याने करण्यात आली होती. त्या काळात कै. किसन हरिश्चंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे व्यवस्थापन अत्यंत चोखपणे चालत होते. त्यानंतर १९८७ मध्ये दुसऱ्यांदा मंदिर उभारण्यात आले आणि गेली अनेक दशके हे पवित्र स्थान ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र ठरले आहे.
नवरात्र, शिमगा, दहीहंडी, गाव राखण अशा परंपरागत सण-उत्सवांमध्ये मंदिराचा सहभाग नेहमीच विशेष राहिला आहे. आज या मंदिराच्या जीर्णोद्धारामागे, निनावी देवी प्रसादिक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि मानकरी दत्ताराम उर्फ बावा सुर्वे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, ते गेल्या ३५ वर्षांपासून समर्पित भावनेने हे कार्य पार पाडत आहेत.
सन् २०२३ ते २०२५ या काळात स्थानिक ज्ञातीबंधू, बाजारपेठ, गावकरी, माहेरवाशीण, पंचक्रोशीतील भक्तगण, पाहुणे आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने मंदिराचे बांधकाम भव्य स्वरूपात पूर्ण करण्यात आले. कळसाची देखणी सजावट, सुबक आतील रचना, रंगसंगती आणि सजावट या नव्या मंदिराचे वैशिष्ट्य ठरत आहेत. ही नव्याने उभारलेली पवित्र वास्तू म्हणजे श्रद्धा, एकता आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे मूर्त रूप आहे. येणाऱ्या जीर्णोद्धार महोत्सवासाठी गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.