पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) विभागाने पपला गुज्जर टोळीच्या गुन्हेगारी जाळ्याशी संबंधित चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश आहे. ही कारवाई मोहालीतील विमानतळ चौकात करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून १.९९ लाख रुपये रोख रक्कम, एक .४५ बोर पिस्तूल, चार .३२ बोर पिस्तुले, अनेक काडतुसे आणि दोन स्कॉर्पिओ-एन एसयूव्ही वाहने जप्त केली आहेत. खरार पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, ही टोळी उत्तर प्रदेशातून अवैध हत्यारे आणून पंजाबमध्ये पुरवठा करत होती, असे तपासात उघड झाले आहे.
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ही कारवाई पपला गुज्जर टोळीच्या शस्त्र पुरवठा साखळीतील एक महत्त्वाचे टोक उघड करणारी आहे.” अटकेत असलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत — कंदर शेख, महाराष्ट्रातील मूळ रहिवासी; सध्या मुल्लानपूर गरीबदास येथे वास्तव्यास. बीए पदवीधर असलेला सिकंदर स्पोर्ट्स कोट्यातून सैन्यात भरती झाला होता, मात्र नंतर त्याने नोकरी सोडली. तो विवाहित असून, गेल्या पाच महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत होता. दानवीर (२६, छता गाव, मथुरा) – दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला, पैशासाठी गुन्हेगारीकडे वळलेला, बंटी (२६, मथुरा जिल्हा) – बारावी शिक्षित, विवाहित. कृष्णा उर्फ हॅपी गुज्जर (२२, नाडा नयागाव) – याच्यावर यापूर्वी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
पपला गुज्जर टोळीची कार्यपद्धती
विक्रम उर्फ पपला गुज्जर या कुख्यात गुंडाच्या नेतृत्वाखालील टोळी हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात सक्रिय आहे. ही टोळी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून अवैध शस्त्रे आणून पंजाबमध्ये विक्री करते. दानवीर आणि बंटी हे एसयूव्हीद्वारे दोन पिस्तुले घेऊन आले होते. ती शस्त्रे सिकंदरकडे सुपूर्त करायची होती, तर सिकंदर ती हॅपीकडे पोहोचवणार होता, असे चौकशीत उघड झाले.
२४ ऑक्टोबर रोजी सीआयए टीमने गुप्त माहितीच्या आधारे विमानतळ चौकात सापळा रचला. त्यावेळी दानवीर, बंटी आणि सिकंदर शस्त्रांची देवाणघेवाण करत असताना पकडले गेले. त्यांच्या जबानीवरून हॅपीला नाडा नयागाव येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुले जप्त करण्यात आली.
चौकशीत दानवीर हा हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, शस्त्र कायदा आणि एटीएम चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असल्याचे समोर आले आहे. तोच टोळीचा प्रमुख शस्त्र पुरवठादार असल्याचे उघड झाले असून, यापूर्वीही त्याने पंजाबमध्ये हत्यारे पुरवली होती. चौकशीत सर्व आरोपींनी टोळीशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू केला असून, उत्तर प्रदेश आणि हरियाणात छापेमारी सुरू आहे. तपासात आणखी शस्त्रसाठा सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

