(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी)
‘आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मुलानेच पार पाडावी’, अशी रूढ मानसिकता समाजात आजही अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, या पारंपरिक चौकटीला छेद देत खेड तालुक्यातील पालांडे कुटुंबातील पाच मुलींनी आपल्या आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली. चार मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला, तर मोठी कन्या ममता मंगेश भोसले यांनी मुखाग्नी देत अंतिम विधी पूर्ण केला. या कृतीतून ‘मुलगा-मुलगी समान’ या विचाराला केवळ शब्दांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे.
मु. पो. खेड महाडनाका, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील रहिवासी गं. भा. लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांचे २१ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पालांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आईच्या निधनानंतर पाचही कन्या ममता मंगेश भोसले, सुनयना सुधीर सावंत, ज्योती हरिष मोरे, सुजाता राहुल भोसले आणि निता विक्रम रेपाळे यांनी एकत्र येत आईच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. अंत्ययात्रेदरम्यान चार बहिणींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला. तर मोठी कन्या ममता मंगेश भोसले यांनी मुखाग्नी देऊन आईच्या अंतिम विधींना पूर्णत्व दिले.
ममता भोसले या तिसे शिगवणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आईच्या निधनाचे दुःख मनात असतानाही त्यांनी धैर्याने पुढाकार घेत बहिणींसोबत आईच्या अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या निर्णयाला चारही बहिणींनीही खंबीर साथ दिली. अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच पार्थिवाला खांदा द्यावा किंवा मुखाग्नी द्यावा, अशी रूढ झालेली सामाजिक मानसिकता पालांडे कुटुंबाच्या कृतीने विचार करण्यास भाग पाडणारी ठरली आहे. मुलगा नसला तरी मुलीही आई-वडिलांच्या शेवटच्या प्रवासाची जबाबदारी तितक्याच कर्तव्यभावनेने आणि संवेदनशीलतेने पार पाडू शकतात, हा संदेश या पाच बहिणींनी आपल्या कृतीतून दिला.
आज शिक्षण, प्रशासन, उद्योग, विज्ञान, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मग आई-वडिलांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यापासून त्यांच्या अखेरच्या प्रवासातील जबाबदारी पार पाडण्यापर्यंत मुलींची भूमिका दुय्यम का असावी, हा प्रश्न या घटनेतून पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालांडे कुटुंबाने घेतलेला निर्णय हा केवळ अंत्यसंस्कारापुरता मर्यादित नसून बदलत्या सामाजिक मानसिकतेचे प्रतीक ठरला आहे. वंशाचा दिवा, मुखाग्नी किंवा अंत्यसंस्काराची जबाबदारी यांसारख्या रूढ कल्पनांपेक्षा आई-वडिलांप्रती असलेले प्रेम, कर्तव्य आणि ऋणानुबंध अधिक महत्त्वाचे आहेत, हा विचार या बहिणींनी अधोरेखित केला.
‘मुलगा-मुलगी समान’ ही संकल्पना केवळ भाषणांमध्ये किंवा समाजमाध्यमांवरील संदेशांमध्ये न राहता ती प्रत्यक्ष जीवनातही उतरवली जाऊ शकते, याचे संवेदनशील उदाहरण खेड तालुक्यात पाहायला मिळाले. दुःखाच्या प्रसंगातही पाचही बहिणींनी दाखविलेल्या धैर्यामुळे त्यांच्या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे. स्व. लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. आई-वडिलांच्या आयुष्यभराच्या प्रेमाचे ऋण फेडण्याची संधी मुलगा असो वा मुलगी—कर्तव्याची भावना लिंग पाहून ठरत नाही. पालांडे कुटुंबातील पाच बहिणींनी आपल्या कृतीतून हाच मोलाचा सामाजिक संदेश दिला आहे.

