(खेड-रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील कुडोशी येथील रवींद्र सीताराम पवार (वय ४८) या व्यक्तीस एका विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची व विविध कलमान्वये वेगवेगळ्या शिक्षा आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ५ एप्रिल २०२० रोजी घडली होती. पीडित महिला ही विधवा असून ती आपल्या लहान मुली व सासूसह राहत होती. आरोपी रवींद्र पवार याने तिच्या घरी जबरदस्तीने घुसून तिला मानसिक त्रास दिला होता. पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला पट्ट्याने मारहाण केली आणि डोक्यात कुन्हाडीने वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित महिला, तिची मुलगी आणि सासू यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. वैद्यकीय तपासणीच्या पुराव्यांनीही आरोपीविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार पक्षातर्फे ॲड. मृणाल जाडकर यांनी खटल्याचे कामकाज हाताळत प्रभावी युक्तिवाद सादर केला. तपासी अधिकारी म्हणून महिला सहायक पोलिस निरीक्षक वैशाली अडकूर यांनी तपास केला, तर कोर्ट पॅरवीसाठी पोलिस कर्मचारी चंद्रमुनी ठोके यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने आरोपीस भारतीय दंडविधानाच्या कलम ३७६ नुसार १० वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, तर कलम ४५२, ४३५, ४२७ व ५०६ नुसार प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास प्रत्येकी ३ महिने साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या असून, या निकालामुळे महिलांवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयीन यंत्रणेने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.