(नवी दिल्ली)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि पारदर्शकतेकडे नेणारी घोषणा केली आहे. आता प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर QR कोड असलेले बोर्ड बसवले जाणार आहेत. हा कोड स्कॅन करताच त्या रस्त्याशी संबंधित सर्व तपशील, जसे की कंत्राटदाराचे नाव, सल्लागार संस्था, आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती जनतेला थेट पाहता येणार आहे.
गडकरी म्हणाले, “जर रस्ता खराब असेल आणि लोक सोशल मीडियावर तक्रार करत असतील, तर त्यांना कोण जबाबदार आहे हे माहित असले पाहिजे. QR कोडमुळे नागरिकांना थेट योग्य ठिकाणी प्रश्न विचारता येतील.”
गडकरींनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते बांधकाम कंपन्यांना स्वतःचे YouTube चॅनेल तयार करण्याचे आणि प्रत्येक प्रकल्पाचे व्हिडिओ अहवाल जनतेसमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे प्रकल्पांची पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक वाढेल.
ते पुढे म्हणाले, “लोक टोल भरतात, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते मिळालेच पाहिजेत. हवामान किंवा खराब डांबरीकरण ही सबब असू शकत नाही. जर रस्ता खराब असेल, तर तो तातडीने दुरुस्त करा. खर्च वाढला तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सुखकर प्रवासाशी तडजोड होऊ नये.”
गडकरींच्या या निर्णयामुळे महामार्ग व्यवस्थापनात ‘Accountability Culture’ निर्माण होणार असून, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत जबाबदारी स्पष्टपणे निश्चित केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

