(सिंधुदुर्ग)
संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मटका अड्ड्यावरील थेट कारवाईचे आता पोलिस यंत्रणेलाही चटके बसू लागले आहेत. कणकवलीतील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी टाकलेल्या छाप्याच्या अवघ्या २४ तासांत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांनी ही कारवाई करताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पालकमंत्र्यांची थेट कारवाई, पोलीस यंत्रणेत खळबळ
गुरुवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर अचानक छापा टाकत बेकायदेशीर धंद्यांविरोधात थेट कारवाई केली. या कारवाईने संपूर्ण शहरात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांसमोरच सुरू असलेले अवैध व्यवसाय, त्याला मिळणारं संरक्षण, आणि यंत्रणांची निष्क्रियता यावर बोट ठेवलं गेलं.
“अवैध धंद्यांना पाठीशी घालणाणाऱ्यांची गय नाही” – राणे यांचा इशारा
शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळणार नाही. जो कोणी अधिकारी किंवा कर्मचारी अशा धंद्यांना पाठीशी घालेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याच पार्श्वभूमीवर, सायंकाळी उशिरा कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन करण्यात आलं.
पोलीस दलात खळबळ; आणखी कारवायांची शक्यता
या घटनेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार हे जरी अपेक्षित होतं, तरी पहिला बळी कोण घेईल याबाबत अनिश्चितता होती. अखेर कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांनी कणकवली पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करत पहिला मोठा निर्णय घेतला. याप्रकरणात इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नंतर पुढचा नंबर कोणाचा? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
पालकमंत्र्यांनी स्वतः मटका बुकि बसलेल्या ठिकाणी धाड टाकत ही कारवाई केली. मात्र यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांना घटनास्थळी पोहोचायला काही कालावधी लागला. ज्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे व अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांनी स्वतः कारवाई करावी अन्यथा मी त्या ठिकाणी पोचणार असे सांगत त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सुचक इशारा दिला होता. व या इशाऱ्यानंतर या कारवाईत पहिला नंबर कणकवली पोलीस निरीक्षकांचा लागल्याने कणकवलीच्या पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस यंत्रणा बदनाम, राणेंची धडक मोहीम सुरू
ही घटना केवळ सिंधुदुर्गापुरती मर्यादित राहिलेली नाही. अवैध मटका व्यवसायाला पोलीस संरक्षण मिळत असल्याचं चित्र या छापेमारीमुळे समोर आलं असून, त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा बदनाम झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी आणि परिणामकारक मोहीम सुरू झाली आहे, असं स्पष्ट होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकारी आता सतर्क झाले असून, पुढील काही दिवसांत अजूनही मोठ्या कारवायांची शक्यता आहे.

