(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) ड्युटीवर मद्यसेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यव्यापी अचानक तपासणी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत चालक, वाहक (कंडक्टर) आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची मद्यसेवन तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये तब्बल १७०१ कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
तपासणीत सात कर्मचारी दोषी ठरले आहेत. यामध्ये एक चालक, चार तांत्रिक कर्मचारी, एक सफाई कामगार आणि एक कंडक्टर यांचा समावेश आहे. विभागनिहाय पाहता, धुळे जिल्ह्यात एक चालक, एक तांत्रिक कर्मचारी आणि एक सफाई कामगार दोषी ठरले; नाशिकमध्ये एक चालक, परभणीत आणि भंडाऱ्यात प्रत्येकी एक तांत्रिक कर्मचारी तर नांदेडमध्ये एक कंडक्टर दोषी आढळला. या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पुढील शिस्तभंग कार्यवाही सुरू आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर कठोर भूमिका घेत, स्पष्ट इशारा दिला आहे, “एसटीमध्ये मद्यपी कर्मचाऱ्यांना कुठलाही आश्रय मिळणार नाही. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर दया किंवा माफी दिली जाणार नाही.” त्यांनी सुरक्षा विभागाला अशा तपासण्या नियमित आणि अनपेक्षितपणे राबवण्याचेही निर्देश दिले आहेत. भविष्यात, महामंडळाने चालकांच्या सीटजवळ ‘ब्रेथ ॲनलायझर’ यंत्र बसवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ड्युटीपूर्वीच चालकाने मद्यसेवन केल्यास त्वरित ओळख पटेल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देता येईल.
मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी ही जनवाहिनी आहे, त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता हा आमचा सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा आहे. ही कारवाई शिस्त वाढवेल आणि गैरवर्तनाला आळा घालेल.” या मोहिमेचे जनतेकडून स्वागत होत असून, त्यामुळे एसटीची सेवा अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

