(नवी मुंबई)
आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने जबरदस्त खेळ करत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने केवळ अंतिम फेरीत प्रवेश मिळवला नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदाच्या आशाही धुळीत मिळवल्या. येत्या 2 नोव्हेंबर रोजी भारताची फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 49.5 षटकांत 338 धावा केल्या आणि भारतासमोर 339 धावांचे आव्हान उभे केले. महिला विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग ठरला. जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद 127 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 89 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने 9 चेंडू राखून हा ऐतिहासिक विजय मिळवला.
भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे नव्हती. प्रतिका रावलच्या दुखापतीनंतर संधी मिळालेल्या शेफाली वर्मा केवळ 10 धावांवर बाद झाली, तर स्मृती मंधाना (24)ही लवकर माघारी गेल्याने भारताची स्थिती चिंताजनक झाली होती. मात्र हरमनप्रीत आणि जेमिमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भक्कम भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. या दोघींच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने 339 धावांचे लक्ष्य सहज गाठले. अखेरीस ऋचा घोष (26*) आणि अमनजोत कौर (15*) यांनी सामना जिंकवला.
याआधी ऑस्ट्रेलियाकडून होबे लिचफिल्डने 93 चेंडूत 119 आणि एलिस पेरीनं 77 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. अॅशले गार्डनरने शेवटच्या टप्प्यात 66 धावांची झंझावाती खेळी केली. तरीही भारताच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स घेत कांगारूंना थांबवलं.
भारतीय संघाचा हा विजय केवळ उपांत्य फेरीतील नव्हे, तर आत्मविश्वासाचा नवा अध्याय ठरला आहे. गतसाखळी फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत टीम इंडियाने अंतिम फेरीसाठी विजयी धडाका सुरू ठेवला आहे.

