भारतीय बॅडमिंटनला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणारी ‘बॅडमिंटन क्वीन’ सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या गंभीर दुखापतींशी झुंज देत असलेल्या सायनाने शरीर साथ देत नसल्याचे सांगत आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. सायना गेल्या दोन वर्षांपासून गुडघ्याच्या जुनाट समस्येमुळे त्रस्त होती. तिने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर सातत्याने दुखापतीमुळे ती स्पर्धांपासून दूर राहिली.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. “माझ्या गुडघ्याची दुखापत गंभीर असून मला संधिवात झाला आहे. सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी दररोज ८ ते ९ तास सराव करावा लागतो. मात्र माझा गुडघा एक-दोन तासांतच साथ सोडायचा. सूजही यायची. अशा परिस्थितीत अधिक सराव करणे अशक्य झाले. शरीर साथ देत नसेल, तर थांबणेच योग्य असते,” असे सायनाने सांगितले.
सायना नेहवालने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास घडवला होता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकदरम्यान तिला गंभीर दुखापत झाली होती. मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने दमदार पुनरागमन करत २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली.
माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या सायनाने सांगितले की, आपल्या शारीरिक स्थितीबाबत तिने पालक आणि प्रशिक्षकांना आधीच कल्पना दिली होती. “औपचारिक निवृत्ती घोषणेपेक्षा माझी स्पर्धांमधील अनुपस्थितीच चाहत्यांना सर्व काही सांगून जाईल,” असा विश्वासही तिने व्यक्त केला.
सायना नेहवालच्या निवृत्तीमुळे भारतीय बॅडमिंटनमधील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला आहे. तिच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल क्रीडा विश्वातून आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

