(नवी दिल्ली)
IPL 2026 स्पर्धेदरम्यान संघांच्या सततच्या हवाई प्रवासामुळे मोठ्या प्रमाणावर विमान इंधनाचा वापर होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, उर्वरित आयपीएल सामने मर्यादित मैदानांवर आणि प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याची मागणी पुढे आली आहे. दिल्ली आणि देशातील व्यापारी-उद्योजकांची सर्वोच्च संघटना असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) ने केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र पाठवून आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली आहे.
CTI चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी पत्रात म्हटले आहे की, आयपीएल संघांनी 28 मार्चपासून सुरू झालेल्या स्पर्धेदरम्यान लाखो किलोमीटरचा हवाई आणि रस्ते प्रवास केला असण्याची शक्यता आहे. विविध शहरांमध्ये सामने होत असल्याने चार्टर्ड विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत इंधन बचत आणि संसाधनांचा नियंत्रित वापर आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘प्रेक्षकांशिवाय IPL घ्या’; कोविड मॉडेलचा दाखला
ब्रिजेश गोयल यांनी केंद्र सरकारला सुचवले की, उर्वरित IPL सामने निवडक मैदानांवर आणि प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात यावेत. त्यांनी कोविड-19 काळातील उदाहरण देत सांगितले की, त्या काळातही मर्यादित मैदानांवर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या मते, एका आयपीएल सामन्यासाठी सरासरी 50 हजार प्रेक्षक उपस्थित राहतात. त्यामुळे हजारो वाहनांचा वापर होतो आणि मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल खर्च होते. जर सामने प्रेक्षकांशिवाय झाले, तर लाखो लिटर इंधनाची बचत होऊ शकते.
IPL संघांच्या प्रवासात किती इंधन खर्च होते?
CTI ने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल संघांकडून वापरली जाणारी चार्टर्ड विमानं, जसे की Boeing 737 आणि Airbus A320, प्रति तास सरासरी 2400 ते 3000 लिटर विमान इंधन वापरतात. जर एखादा विमानप्रवास साधारण दोन तासांचा असेल, तर एका प्रवासासाठी 5000 ते 6000 लिटर एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) खर्च होते. विमानाचे वजन अधिक असल्यास किंवा लांब अंतराचा प्रवास असल्यास हा आकडा 7000 ते 8000 लिटरपर्यंत जाऊ शकतो. CTI च्या अंदाजानुसार, प्रत्येक संघ साधारण 10 वेळा हवाई प्रवास करत असल्याने एका संघाकडूनच 50 हजार ते 70 हजार लिटर विमान इंधन वापरले जात आहे.
‘देश इंधन बचतीसाठी प्रयत्न करत असताना IPL वर प्रश्न’
CTI अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचा सल्ला दिल्यानंतर सरकारी विभाग, अधिकारी आणि सामान्य नागरिक अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये होणारा प्रचंड इंधन वापर गंभीरपणे विचार करण्यासारखा आहे. त्यांनी उर्वरित IPL 2026 सामन्यांचे वेळापत्रक बदलून कमी मैदानांवर सामने घेण्याची मागणी करत, यामुळे देशावरील इंधनाचा ताण कमी होईल आणि पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असे म्हटले आहे.

