भारताच्या महिला क्रिकेटसाठी नोव्हेंबर महिना दुहेरी सुवर्णक्षण घेऊन आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आता दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकत या यशावर कळस चढवला आहे. कर्णधार दीपिका टीसीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात नेपाळचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला.
अंतिम सामना : अचूक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीचा मिलाफ
रविवारी (२३ नोव्हेंबर) कोलंबोतील पी. सारा ओव्हल मैदानावर हा ऐतिहासिक सामना पार पडला. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो अचूक ठरला. भारतीय गोलंदाजांनी नेमकेपणाने मारा करत नेपाळला २० षटकांत ५ गडी गमावून फक्त ११४ धावांवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवली. भारताने हे माफक लक्ष्य केवळ १२.१ षटकांत ३ गडी गमावून सहज पूर्ण केले.
सामनावीर फुला सरेन
भारताच्या विजयानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती फुला सरेनच्या अष्टपैलू कामगिरीची.
- फलंदाजीत : २७ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ४४ धावा
- गोलंदाजीत : ३ षटके, २० धावा
तिच्या सर्वांगीण कामगिरीसाठी तिला सामनावीराचा किताब देण्यात आला.
या ऐतिहासिक संघाचे नेतृत्व कर्नाटकची दीपिका टीसी ने केले. लहानपणी अपघातात दृष्टी गमावूनही तिने हार मानली नाही. शालेय जीवनातच तिने क्रिकेटला सुरुवात केली आणि आता ती विश्वविजेत्या संघाची कर्णधार ठरली आहे. या संघाची गंगा कदम उपकर्णधार होती.
११ नोव्हेंबरपासून दिल्लीत सुरू झालेल्या या पहिल्यावहिल्या महिला ब्लाइंड टी-२० विश्वचषकात भारतासह ६ संघ सहभागी झाले होते, त्यामध्ये भारत, नेपाळ, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि पाकिस्तान या देशांचा समावेश होता.
ब्लाइंड क्रिकेटचे खास नियम
ब्लाइंड क्रिकेट सामन्यांमध्ये काही विशिष्ट नियम पाळावे लागतात:
* चेंडू:
पांढऱ्या रंगाचा, बेअरिंग भरलेला चेंडू वापरला जातो, ज्यामुळे आवाजातून दिशेचा अंदाज येतो.
* गोलंदाजी:
गोलंदाजी अंडरआर्म पद्धतीनेच, गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी “तयार आहेस का?” विचारणे आवश्यक, “प्लेय” असा मोठ्याने इशारा दिल्याशिवाय चेंडू सोडता येत नाही, चेंडूचा किमान एक टप्पा पडणे बंधनकारक.
* संघरचना:
११ पैकी किमान ४ खेळाडू पूर्णपणे दृष्टीहीन असणे आवश्यक.

