(गुहागर / रामदास गमरे)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत मुंढर कातकरी कार्यक्षेत्रात लोकसहभागाच्या आधारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असताना या अभियाना अंतर्गत मौजे मुंढर खुर्द आडीवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांच्या श्रमदानातून मुंढर खुर्द-वळवणवाडी ते आडीवाडी या एक किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे जांभा दगडांनी भरून काढण्यात आले. सदर वाडीत रस्त्याला मोठमोठे खड्डे असल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, त्यामुळे ग्रामस्थांना प्रवासासाठी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत श्रमदानाची तजवीज केली आणि कमी वेळात रस्ता दुरुस्त केला. परिणामी एसटी वाहतूकही तात्काळ पूर्ववत सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.
सदर उपक्रमात आडीवाडी ग्रामस्थ व महिला मंडळाचे विशेष योगदान राहिले त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे, सदर श्रमदानासाठी सरपंचा अमिषा अजित गमरे, ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांचे मनोबल वाढवले. या श्रमदानासाठी सर्व सहभागींचे ग्रामपंचायतीतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

