(संगमेश्वर / प्रतिनिधी)
“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी” या मंगल जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला आणि भक्तीभावाने ओथंबलेल्या वातावरणात माळवाशी गावातील वारकऱ्यांनी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान केले. आज 29 ऑक्टोबर रोजी सकाळी माळवाशी शाळेजवळील परिसरात या बससेवेच्या शुभारंभाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी गावचे उपसरपंच सुनील सावंत, चंद्रकांत कडू, बळीराम गुरव, बाळकृष्ण पांडुरंग करंडे, रमेश जौरत, सदानंद कडू, बाळकृष्ण सखाराम करंडे, बावा जौरत, महेंद्र कडू यांच्यासह परिसरातील शेकडो वारकरी भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ह.भ.प. सदानंद कडू महाराज म्हणाले, ओम आदिनाथ सांप्रदाय ऐक्यवर्धक शिष्टमंडळ या संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून ही पंढरपूर वारी आयोजित केली जाते. शेतीची कामे पूर्ण करून शेतकरी व कष्टकरी वर्ग भक्तिभावाने या वारीत सहभागी होतो. कार्तिकी एकादशीपर्यंत वारकरी पंढरपूर येथे विठुमाऊलीच्या चरणी सेवा अर्पण करून गावी परतल्यानंतर गंगापूजनाचा सोहळा पार पाडतात. हरिनामाचा जागर ही माळवाशीची ओळख बनली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटनावेळी बोलताना उपसरपंच सुनील सावंत म्हणाले, माळवाशी ग्रामस्थांना वारीची समृद्ध परंपरा लाभली आहे. ज्येष्ठांसोबत तरुण पिढीही या वारीत उत्साहाने सहभागी होत असून हा भक्तीचा सोहळा गावात एकतेचे व समाधानाचे वातावरण निर्माण करतो. यावेळी सोमाआबा जौरत, जौरत गुरुजी, पांडुरंग पवार, मनोहर सावंत, दिलीप करंडे आदींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

