( गुहागर )
मच्छीमार बांधव व भगिनींसाठी समुद्री शेवाळ शेतीच्या माध्यमातून अर्थिक प्रगतीचा नवा मार्ग खुला होत असून, या क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या अनेक शक्यता आहेत. गुहागर तालुक्यातील कोंड करूळ येथे दि. १० जुलै समुद्री शेवाळ पालनावर आधारित विशेष मार्गदर्शन कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले.
रिलायन्स फाउंडेशन, जलजीविका संस्था व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शेवाळ शेतीचे महत्व, व्यवसायिक शक्यता, तांत्रिक बाबी आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात जलजीविका संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. चिन्मय दामले यांनी स्थानिक स्तरावर शेवाळ शेतीमुळे रोजगाराची उपलब्धता कशी वाढू शकते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक श्री. राज पवार आणि सृष्टी सुर्वे यांनी राफ्ट बांधणीची प्रात्यक्षिके सादर केली.
मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी श्री. स्वप्नील चव्हाण यांनी समुद्री शेवाळ शेतीच्या माध्यमातून उपजीविकेचा नवा पर्याय मच्छीमारांनी स्वीकारावा असे आवाहन केले. यासोबतच त्यांनी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली तसेच अपघात गट विमा व NFDB पोर्टलवरील नोंदणीबाबत उपस्थितांचे मार्गदर्शन केले. रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राजेश कांबळे यांनी मच्छीमार बांधवांना या जोडधंद्याचे फायदे स्पष्ट करून दिले. शेवाळ शेतीसाठी आवश्यक सर्व तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन जलजीविका संस्था व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत पुरवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला सागरमित्र, सागरी पर्यवेक्षक विनायक शिंदे, सुरक्षा रक्षक, रिलायन्स फाउंडेशनचे गौरव जाधव, कोंड करूळ ग्रामस्थ व मच्छीमार बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम मच्छीमार समुदायाच्या सशक्तीकरणाकडे एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत सहभागी प्रतिनिधींनी व्यक्त केले.

