(चिपळूण)
तालुक्यातील वैजी गावात पुण्यातील महिलेच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश करून लोखंडी फलक तोडत घराची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, चौघांविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वसंत गोविंद भडवलकर, वनिता वसंत भडवलकर, संतोष वसंत भडवलकर आणि रणजित वसंत भडवलकर (सर्व रा. वैजी, चिपळूण) अशी संशयितांची नावे असून, माधुरी शेखर सावंत (वय ५९, रा. कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादींच्या मालकीची वैजी येथे जागा असून, त्यांनी त्या ठिकाणी आपले नाव असलेला लोखंडी फलक उभारला होता. मात्र, संबंधित चौघांनी अनधिकृतपणे या जागेत प्रवेश करून तो फलक फोडला तसेच घराच्या बांधकामाचे नुकसान केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२९ (३), ३२४ (५) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

