(चिपळूण/ प्रतिनिधी)
येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह तीन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया सोमवारी (दि. १२) दुपारी २.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडणार आहे. या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, इच्छुकांची संख्या वाढल्याने अंतर्गत चढाओढ तीव्र झाली आहे.
नियमानुसार शिंदेसेना, भाजप आणि उद्धवसेना या तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या तीन पदांसाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत असून, संभाव्य नाराजी टाळण्यासाठी संबंधित पक्षांकडून उमेदवारांच्या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सद्यःस्थितीत उपनगराध्यक्षपदापेक्षा स्वीकृत नगरसेवकपदासाठीच अधिक चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. सोमवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे अर्ज सादर करायचे आहेत. अर्जांची छाननी करून नगराध्यक्ष सकपाळ वैध उमेदवारांची नावे जाहीर करतील. दुपारी १.४५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, आवश्यक ठरल्यास दुपारी २.३० वाजता मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदांसाठीचे अर्ज ९ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे पाठवले जाणार असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज नगराध्यक्ष सकपाळ यांच्याकडे पोहोचतील. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. या पदांसाठी शिंदेसेनेकडून विकी लवेकर आणि सुयोग चव्हाण, भाजपकडून महेश दीक्षित, विनायक वरवडेकर, मंगेश ऊर्फ बाबू तांबे, आशिष खातू, उदय चितळे, रुही खेडेकर, तर उद्धवसेनेकडून बाळा कदम आणि फैसल कास्कर यांची नावे चर्चेत असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

