(रत्नागिरी)
वर्षातून दोन वेळा पंढरपूर नगरीत एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीची वारी परंपरेप्रमाणे मोठ्या थाटात पार पडत असली तरी त्या काळात खरीप हंगामातील शेतीची लगबग सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक भाविकांना पंढरपूरकडे जाता येत नाही. मात्र कार्तिकी एकादशीला भाविकांचा हा ताफा मोठ्या संख्येने विठूरायाच्या दर्शनासाठी निघतो. यंदा २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी महामंडळाने तब्बल १५२ जादा गाड्यांचे नियोजन केले असून, यापैकी १३५ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील विविध आगारांतून लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, देवरूख, खेड आणि दापोली याठिकाणांहून भाविकांनी उत्साहाने गटनोंदणी केली आहे. त्यामुळे या गावांतून थेट पंढरपूरकडे गाड्या सुटणार आहेत. महामंडळाने उर्वरित गाड्यांचे आरक्षण लवकरच पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
भाविकांच्या सोयीसाठी या जादा बससेवा २८ ते २९ ऑक्टोबर पासून पंढरपूरकडे रवाना होत आहेत. एकादशीचा उत्सव संपल्यानंतर ३ नोव्हेंबरपासून परतीच्या गाड्या सुरू होतील. एसटी विभागाच्या या तयारीमुळे भाविकांना पंढरपूरला जाणे सुलभ होणार असून, जिल्ह्यातील विठ्ठलभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने “जय हरि विठ्ठल!”च्या गजरात रत्नागिरीहून पंढरपूरकडे भाविकांची अखंड वारी सुरू होणार आहे.

