(चिपळूण)
रावतळे येथे रविवारी झालेल्या दुचाकी अपघाताला महामार्ग कामाचा ठेका घेतलेली ईगल कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षासह स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कंपनीमार्फत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील परिसर अक्षरश: मृत्यूचा सापळाच बनला आहे. कंपनी व्यवस्थापन मनमानी कारभार करत आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. थेट रस्त्यावर बॅरिकेट्स उभारल्याने रस्ता अरूंद होऊन वारंवार अपघात घडत आहेत. तरी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, तसेच अपघातग्रस्त महिलेला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह सुबोध सावंत-देसाई, विनोद कदम यांनी केली.
शहरातील रावतळे येथे दुचाकी घसरून कान्हे पिंपळी येथील शमीन सुलतान सनगे या गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातानंतर पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह व स्थानिक नागरिकांनी ईगल कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ठेकेदार कंपनीच्या हलगजपणामुळेच हा अपघात झाल्याचा थेट आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना श्री. शाह, सुबोध सावंत देसाई, विनोद कदम म्हणाले की, शहरात सुरू असलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण आणि उड्डाणपुलाचे काम अतिशय दर्जाहीन होत आहे. उड्डाणपुलाचे काम करताना कंपनीने सुरक्षितेबाबत कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. ना स्वत:च्या कामगारांची ना नागरिकांची. कामासाठी थेट रस्त्यावर बॅरिकेट्स उभारल्याने रस्ता अरूंद झाला आहे. रस्त्यावर चिखल, खडी, वाळू साचून सातत्याने अपघात घडत आहेत. चिखलमय रस्त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापक जयंतीलाल यांना कल्पना देऊनही दखल घेतली जात नाही.
यापूर्वीही उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर तेथे पाहाणी करण्यासाठी गेलेले आमदार शेखर निकम व सहकारी हे सुध्दा मोठ्या अपघातातून बालंबाल बचावले होते. पावसाळ्यात रावतळे परिसरात मुले अडकल्याची घटना घडली होती. अशा घटनांचा अनुभव असतानाही कंपनी व्यवस्थापन बेजबाबदारपणे वागत आहे. मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे या परिसरात वाहनधारकांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कंपनी जनतेच्या जीवाशी खेळत आहे. येथील नागरिकांनी अजून किती दिवस हे सहन करायचे? असा संतप्त सवाल उपस्थित करत यापुढे ते सहन केले जाणार नाही.पोलिसांनी या कंपनीवर गुन्हा दाखल करावा. ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. सोमवारी यासंदर्भात चिपळूण पोलीस स्थानक, राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन दिले जाणार असल्याची माहिती श्री. शाह यांनी दिली. या वेळी संतोष सावंत देसाई, संजय जाधव, इम्तियाज कडू आदी उपस्थित होते.