(चिपळूण)
कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील खेर्डी येथे शनिवारी रात्री दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार युवक १२ टायर मालवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, या अपघातात आणखी दोघे युवक जखमी झाले आहेत. समीर चंद्रकांत चिवेलकर (वय ३३, रा. खेर्डी, चिपळूण) असे मृत युवकाचे नाव असून, साईराज सावंत व सनिल पवार अशी जखमींची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, समीर चिवेलकर हे आपल्या दुचाकीवरून बहाद्दूरशेख नाक्याहून खेर्डीकडे जात होते. दरम्यान, साईराज सावंत व सनिल पवार हे दोघे दुचाकीवरून उलट दिशेने – बहाद्दूरशेख नाक्याकडे जात होते. याच दरम्यान खेर्डीमार्गे बेळगावच्या दिशेने एक मालवाहू १२ टायर ट्रक जात होता. खेर्डी येथे दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर समीर चिवेलकर रस्त्यावर पडले आणि त्याचवेळी येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आले. यात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. समीर यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी सकाळी खेर्डी येथील स्मशानभूमीत समीर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले असून, या अपघातासंदर्भात पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.