(दिल्ली)
यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणारा रामकेश मीना (वय 26) याचा खून करून तो अपघाती आगीत मृत्युमुखी पडल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी पहाटे तिमारपूर परिसरातील गांधी विहार येथील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली.
सुरुवातीला पोलिसांनी आग लागून झालेल्या अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीतून रामकेशचा मृत्यू आगीमुळे नव्हे तर गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणामागे खुनाचा संशय दृढ झाला.
रामकेशच्या कुटुंबीयांनीही घटनेबाबत संशय व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर, आग लागण्यापूर्वी दोन व्यक्ती इमारतीत जाताना आणि थोड्याच वेळात एक तरुणी बाहेर पडताना दिसल्याने पोलिसांना सुगावा मिळाला. ती तरुणी म्हणजे रामकेशची लिव्ह-इन पार्टनर अमृता चौहान (वय 21, मूळची मोरादाबाद) असल्याचे उघड झाले. अमृता बीएससी फॉरेन्सिक सायन्स शिकत होती आणि मे 2025 पासून रामकेशसोबत राहत होती.
पोलिस तपासानुसार, रामकेशने अमृतासह 15 पेक्षा अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले होते. या व्हिडिओंबाबत कळल्यावर अमृताने ते डिलीट करण्याची मागणी केली, पण रामकेशने नकार देत तिचा अपमान केला होता. त्यामुळे संतप्त अमृता तिच्या माजी प्रियकराकडे परत गेली आणि त्याच्यासोबत राहू लागली. दरम्यान, दोघांनी सूड घेण्याची योजना आखली.
अमृताने तिच्या फॉरेन्सिक ज्ञानाचा वापर करून हा खून ‘अपघाती आग’ असल्याचे भासवण्याचा कट रचला. 5 ऑक्टोबरच्या रात्री ती, तिचा एक्स प्रियकर आणि आणखी एक साथीदार रामकेशच्या फ्लॅटवर गेले. त्यांनी गळा दाबून आणि मारहाण करून रामकेशचा खून केला. त्यानंतर मृतदेहावर तेल, तूप आणि अल्कोहोल ओतून आग लावली. अमृताच्या एक्स प्रियकराने गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर उघडून लायटरने पेटवले. सुमारे एका तासानंतर झालेल्या स्फोटात रामकेशचा मृतदेह पूर्णतः जळून गेला.

पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी अमृताला मोरादाबाद येथून अटक केली, तर 21 आणि 23 ऑक्टोबर रोजी तिचा एक्स प्रियकर आणि साथीदाराला ताब्यात घेतले. तपासात रामकेशच्या लॅपटॉप आणि हार्डडिस्कमध्ये 15 पेक्षा अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले असून, त्याचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

