(मुंबई)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पुण्यातील एका नामांकित डॉक्टरला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आपल्या मुलासाठी NEET परीक्षेचा पेपर बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. या अटकेमुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरने आपल्या मुलाला वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अधिक गुण मिळावेत आणि प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पेपर लीक रॅकेटशी संपर्क साधल्याचा संशय आहे. या व्यवहारासाठी लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचाही तपास सीबीआय करत आहे.
चौकशीसाठी बोलावले आणि थेट अटक
सीबीआयच्या तपासादरम्यान संबंधित डॉक्टर संशयाच्या भोवऱ्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने त्याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. डॉक्टर चौकशीसाठी हजर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चार तास कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान काही महत्त्वाचे पुरावे आणि माहिती समोर आल्यानंतर सीबीआयने संबंधित डॉक्टरला तात्काळ अटक केली. या कारवाईनंतर NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आणखी वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉक्टर मूळचा लातूरचा
अटक करण्यात आलेला डॉक्टर हा पेशाने बालरोगतज्ज्ञ असून सध्या पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो मूळचा लातूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरचे नाव सातत्याने समोर येत असल्याने या प्रकरणातील धागेदोरे पुन्हा एकदा लातूरशी जोडले गेले आहेत. यापूर्वी आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतरही लातूर चर्चेत आले होते.
शिवराज मोटेगावकर कनेक्शनचा तपास
सीबीआय आता अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे शिवराज मोटेगावकर आणि इतर आरोपींशी काही संबंध आहेत का, याचाही तपास करत आहे. पेपर लीक रॅकेटमध्ये शिक्षण क्षेत्र, कोचिंग क्लासेस, पालक आणि काही व्यावसायिकांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या नव्या अटकेमुळे NEET पेपरफुटी रॅकेटची व्याप्ती अधिक मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील आणखी काही मोठी नावे तपासाच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET परीक्षा देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक मानली जाते. अशा परीक्षेत पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

