( दिल्ली )
दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचा आरोप करत केलेल्या तक्रारीमुळे देशभरात खळबळ माजली होती. मात्र, पोलिस तपासात या कथित हल्ल्याचा संपूर्ण कट बनावट असल्याचे उघड झाले आहे. अधिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, हा बनावट हल्ला विद्यार्थिनीच्या वडिलांनीच रचल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रविवारी (२६ ऑक्टोबर) बी.कॉम द्वितीय वर्षाची विद्यार्थिनीने लक्ष्मीबाई कॉलेजजवळ दोन तरुणांनी ॲसिड हल्ला केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिस तपासात घटनेच्या वेळी आरोपी ठरविण्यात आलेले तरुण त्या ठिकाणी नसल्याचे सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्डमधून स्पष्ट झाले.
पोलिसांनी तपास वाढवताच विद्यार्थिनीच्या वडिलांनीच हा बनावट हल्ला रचल्याचे समोर आले. त्यांनी मुलीवर ॲसिडऐवजी टॉयलेट क्लीनर फेकले होते, असे आरोपी वडिल अकील खान यांनी कबूल केले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली. अकील खान यांनी शेजारी जितेंद्र याला या प्रकरणात अडकवण्यासाठी हा बनावट कट रचला होता. कारण, दोघांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. जितेंद्र, अरमान आणि ईशान हे घटनेच्या वेळी अनुक्रमे करोल बाग आणि आग्रा येथे असल्याचे पुराव्यांमधून स्पष्ट झाले.
याचदरम्यान, जितेंद्रच्या पत्नीने अकील खान यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार, २०२१ ते २०२४ दरम्यान ती अकील खान यांच्या कारखान्यात काम करत असताना त्यांनी तिचा लैंगिक छळ केला आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी अकील खान यांना बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील सर्व पुरावे जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे.

