(हैदराबाद)
देशातील माओवाद आणि नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने केंद्र व राज्य यंत्रणांना मोठे यश मिळाल्याचे चित्र आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या लक्ष्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वरिष्ठ माओवादी नेता थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी आणि मल्ला राजी रेड्डी उर्फ संग्राम यांच्यासह सुमारे 20 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.
आसिफाबादच्या जंगलात पोलिसांसमोर आत्मसमर्पण
मिळालेल्या माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेशी संबंधित हे नक्षलवादी तेलंगणातील आसिफाबाद येथील जंगल परिसरात पोलिसांसमोर शरण आले. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
देवजी कोण आहे?
देवजीची गणना माओवादी संघटनेतील प्रमुख नेत्यांमध्ये होते. तो सध्या माओवादी पक्षाच्या सेंट्रल कमिटीचा सचिव असल्याचे सांगितले जाते. माजी महासचिव नंबाला केशव राव याच्या एन्काउंटरनंतर देवजीने पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या देवजीवर तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस घोषित होते.
स्पेशल इंटेलिजन्स ब्युरोसमोर आत्मसमर्पण
मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी (22 फेब्रुवारी) सकाळी तेलंगणा पोलीस स्पेशल इंटेलिजन्स ब्युरो (SIB) समोर हे आत्मसमर्पण झाले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये काही उच्चपदस्थ माओवादी नेत्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
588 माओवादी मुख्य प्रवाहात
तेलंगणा पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी याआधी माओवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले होते. राज्य सरकारच्या ‘आत्मसमर्पण व पुनर्वसन योजना’ अंतर्गत त्यांना आर्थिक व सामाजिक मदत दिली जात आहे. गेल्या दोन वर्षांत तेलंगणा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे तब्बल 588 माओवादी मुख्य प्रवाहात परतले असल्याची अधिकृत माहिती आहे.
नक्षलवादाच्या अस्तित्वावर मोठा आघात
या घडामोडीमुळे माओवादी संघटनेच्या उरलेल्या नेटवर्कवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीची ताकद लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

