(मुंबई)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केली आहे. 28 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, सार्वजनिक आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, पाणीपुरवठा आणि पर्यटन विभागातील महत्त्वाच्या पदांवर नवे चेहरे नियुक्त करण्यात आले आहेत.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खांदारे यांची बदली पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली असून, त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य विभागाचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांच्याकडे आता पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. कुणाल कुमार यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर जल जीवन मिशनचे मिशन संचालक ई. रविंद्रन यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीपचंद्रन यांची नियुक्ती बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे येथे प्रकल्प संचालक म्हणून करण्यात आली आहे. तर यशदाच्या उपमहासंचालक पवनित कौर यांची अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत तीन नवीन कार्यासने — थेट परकीय गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क — निर्माण करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे परदेशातील मराठी नागरिकांशी संपर्क वाढवणे आणि राज्यात परकीय गुंतवणुकीस चालना देणे सुलभ होईल, असा सरकारचा हेतू आहे.
नव्या रचनेनुसार, सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या पदनामाऐवजी आता “सचिव (राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क)” असे पदनाम असेल. यामुळे सध्याच्या तीन कार्यासनांसह नवीन तीन अशी एकूण सहा कार्यासने कार्यरत राहतील.
नवीन 23 पदांची निर्मिती
नवीन कार्यासनांसाठी एकूण 23 नवीन पदे निर्माण करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे राजशिष्टाचार विभागात एकूण 62 पदे कार्यरत असतील. हा विभाग पुढे राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, उच्चायुक्त संबंध, परकीय निधी, व्यापार, परदेशस्थ महाराष्ट्र नागरिकांचे संबंध, सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य, परदेशातील रोजगार संधी, पर्यटन प्रोत्साहन, नवीन तंत्रज्ञान सहकार्य आणि प्रसिद्धी आदी विषय हाताळणार आहे.

