(कोल्हापूर)
प्रज्ञा कांबळे मृत्युप्रकरणातील पोलीस तपासात झालेल्या दिरंगाईविरोधात वंचित बहुजन आघाडी, प्रज्ञाचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि गावकऱ्यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद इमारत परिसरातच थांबवत मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. दोषींना अद्याप शिक्षा झाली नसल्याने प्रज्ञाचे आई-वडील संतप्त झाले असून, “न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू” असा इशारा त्यांनी दिला आहे.
कुरुकलीतील भीषण अपघात आणि प्रज्ञाचा मृत्यू
सुमारे तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या कुरुकली भोगावती महाविद्यालयाजवळ अल्पवयीन चालकाने भरधाव कारने बस स्टँडवर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली होती. या अपघातात प्रज्ञा कांबळे गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर तीन विद्यार्थिनीही गंभीर जखमी झाल्या होत्या. गरीब घरातील ही मुलगी शिक्षणाच्या जोरावर कुटुंबाला उभं करण्याचं स्वप्न बाळगत होती, मात्र तिच्या मृत्यूनं संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोषींवर कारवाई न झाल्याने संताप
या अपघातप्रकरणी काही अल्पवयीन मुलांवर आणि कार मालकावर गुन्हा दाखल झाला असला तरी तपासात दिरंगाई व दडपशाही होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून IG कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. “हा अपघात नसून घातपात आहे; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी प्रज्ञाचे मामा तुकाराम कांबळे यांनी केली.
अपघातानंतर तीन महिने उलटूनही घटनेच्या परिसरातील एकही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कुटुंबीयांनी वारंवार करवीर पोलिसांकडे चौकशी केली, मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, “या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” अशी प्रतिक्रिया करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
या प्रकरणानंतर राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, “प्रज्ञा कांबळेसारख्या विद्यार्थिनींना न्याय न मिळाल्यास राज्यातील मुली खरंच सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संजय गुदगे यांनी उपस्थित केला.

