(जैतापूर / राजन लाड)
रत्नागिरी जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन राऊत याने राज्यस्तरीय ‘अडसूळ ट्रस्ट–कोकण कप’ शालेय कॅरम सुपर लीग स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. आपल्या अचूक नेम, संयम आणि रणनीतीच्या जोरावर आर्यनने स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवत अजिंक्यपद पटकावले.
आर्यन हा जैतापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत यांचा चिरंजीव असून, त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जैतापूर गावाचे तसेच संपूर्ण कोकणाचे नाव उज्ज्वल झाले आहे.
स्पर्धेची पार्श्वभूमी
ही प्रतिष्ठित राज्यस्तरीय कॅरम सुपर लीग स्पर्धा आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि कोकण क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा एकूण सहा टप्प्यांत पार पडली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील २१८ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला.
अंतिम सामन्यात आर्यनची दमदार कामगिरी
अंतिम सहाव्या टप्प्यात आर्यनचा सामना तिसऱ्या टप्प्यातील विजेता प्रसन्न गोळे याच्याशी झाला. सुरुवातीला गोळेने ८–४ अशी आघाडी घेतली होती; मात्र आर्यनने धैर्य, रणनीती आणि अचूक नेम यांच्या बळावर शानदार पुनरागमन करत १७–१२ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयानिशी आर्यनने साखळीतील सर्वाधिक १० गुण मिळवून अजिंक्यपदावर नाव कोरले.
अन्य विजेते
- संयुक्त द्वितीय: प्रसन्न गोळे, पुष्कर गोळे (८ गुण)
- संयुक्त तृतीय: तनया दळवी (राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू), उमैर पठाण (७ गुण)
- संयुक्त चौथा: तीर्थ ठाकर, शौर्य दिवेकर, ग्रीष्मा धामणकर, शिवांश मोरे, दुर्वेश चव्हाण, विराज बर्वे (६ गुण)
उत्तेजनार्थ पुरस्कार
उत्कृष्ट खेळ करणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंमध्ये वेदिका पोमेंडकर, रविराज गायकवाड, एन्जेल पटवा, ओम सुरते, आरव आंजर्लेकर, आर्या सोनार, चैतन्य पोमेंडकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
विजेत्या खेळाडूंना ट्रस्टचे सचिव विष्णू तांडेल, युनियनचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्ट, क्रीडाप्रेमी संजय मांजरेकर, पंच चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, अविनाश महाडिक, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
कोकणातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा
या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील शालेय खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ लाभले असून, आर्यन राऊतसारख्या प्रतिभावान खेळाडूंमुळे ग्रामीण भागातही कॅरम या खेळाची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा वाढण्यास नवी ऊर्जा मिळाली आहे.

