(नवी दिल्ली)
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर जाहीर करण्यात आलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम आता संपण्याच्या मार्गावर असून, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. युद्धविरामानंतर दोन्ही देशांदरम्यान चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान मुनीर यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, जोपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मूजवरील नाकेबंदी उठवली जात नाही, तोपर्यंत इराणसोबत युद्धविरामाबाबतची चर्चा पुढे नेणे शक्य नाही. या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतावर काय होणार परिणाम?
जर अमेरिका–इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाला, तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश असून, सुमारे ८५ टक्के तेल गरजेसाठी परदेशांवर अवलंबून आहे. विशेषतः आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि एलपीजी गॅस आयात केला जातो. युद्धस्थिती कायम राहिल्यास पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होईल.
खतं आणि दैनंदिन वस्तूही महागणार?
ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई हे देश खतांचे प्रमुख निर्यातदार आहेत. युद्धामुळे या देशांमधून होणारा पुरवठा खंडित झाल्यास भारतात खतांच्या किमती वाढू शकतात. त्यासोबतच अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि घरगुती उत्पादनांवरही परिणाम दिसून येऊ शकतो. काही कंपन्यांनी आधीच दरवाढीचे संकेत दिले असून, पुढील काळात महागाईचा ताण अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका–इराण तणाव पुन्हा वाढण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होऊ शकते. याचा थेट फटका भारतासारख्या आयात-आधारित अर्थव्यवस्थांना बसण्याची शक्यता असून, येणारे काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.

