(मुंबई)
आयसीसी महिला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेली सलामीवीर प्रतिका रावल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाली आहे. मात्र, संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे तिच्या जागी धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मा हिचा समावेश करण्यास आयसीसीकडून मंजुरी मिळाली आहे.
शेफाली वर्माचं पुनरागमन
शेफालीचं भारताच्या वन डे संघात जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन होत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर ती वन डे क्रिकेटपासून दूर होती. खराब फॉर्ममुळे काही काळ बेंचवर बसल्यानंतर, तिच्या जागीच प्रतिका रावलला स्मृती मानधनाची नवी सलामी भागीदार म्हणून संघात घेतलं गेलं होतं.
मात्र, शेफालीने या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करत पुनरागमनाचं दार ठोठावलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिने दमदार फलंदाजी केली होती. त्यानंतर ‘इंडिया ए’ संघासोबतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिने तीन सामन्यांत 36, 4 आणि 52 धावांची खेळी करत आपला फॉर्म टिकवून ठेवला. त्यामुळे प्रतिकाच्या अनुपस्थितीत तिचा संघात पुनर्वापसीचा मार्ग मोकळा झाला.
आयसीसीची मान्यता
आयसीसी स्पर्धेत जायबंदी खेळाडूऐवजी नव्या खेळाडूचा समावेश करण्यासाठी तांत्रिक समितीची परवानगी आवश्यक असते. या समितीत वासिम खान, गौरव सक्सेना, अॅबी कुरूविला आणि मेल जोन्स यांचा समावेश आहे. भारतीय संघाने प्रतिकाच्या दुखापतीची माहिती दिल्यानंतर समितीनं परिस्थितीचा विचार करून शेफालीच्या समावेशास मंजुरी दिली.
प्रतिकाची गंभीर दुखापत
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 21 व्या षटकात सीमारेषेवर फिल्डिंग करताना प्रतिकाचा पाय घसरून उजवा घोटा गंभीररीत्या मुरगळला. चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या या अपघातानंतर ती वेदनेने मैदानावर कोसळली होती. न्यूझीलंडविरुद्ध स्मृती मानधनासोबत तिने 212 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात प्रतिकाने 122 धावा केल्या होत्या आणि ती यंदाच्या विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली होती. तिच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या सलामी फलंदाजीपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

