(नवी दिल्ली)
आशिया हॉकी कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दमदार खेळ सादर करत दक्षिण कोरियाचा ४-१ असा दणदणीत पराभव केला आणि चौथ्यांदा आशिया कप विजेतेपद पटकावले. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय ठरला. सुपर-४ फेरीत दक्षिण कोरियासोबतचा सामना २-२ अशी बरोबरीत सुटला होता, मात्र अंतिम फेरीत भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमनाची संधीच दिली नाही.
सामन्याच्या केवळ ३० व्या सेकंदाला सुखजीत सिंगने शानदार गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २७ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने संजयकडून मिळालेल्या पासवर अचूक गोल करत स्कोअर २-० असा केला. तिसऱ्या सत्रात भारताला संजयला मिळालेल्या ग्रीन कार्डमुळे काही काळ खेळाडू कमी ठेवून खेळावे लागले. तरीही दिलप्रीतने तिसरा गोल करून भारताची आघाडी अधिक मजबूत केली. चौथ्या सत्रात अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवरून आणखी एक गोल करत भारताला ४-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्षणी कोरियाने एक गोल केला, पण तो विजयासाठी अपुरा ठरला.

भारताने यापूर्वी २००३ मध्ये पाकिस्तानवर ४-२ ने मात करत पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर २००७ मध्ये दक्षिण कोरियाचा ७-२ ने पराभव करून दुसरा किताब पटकावला होता. २०१७ मध्ये मलेशियावर २-१ अशी मात करून भारताने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. आणि आता २०२५ मध्ये पुन्हा एकदा दक्षिण कोरियाला हरवून भारताने चौथ्यांदा आशिया कपवर नाव कोरले.

