(मुंबई )
झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी बीसीसीआयनं भारतीय अंडर-19 संघाची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईचा आयुष म्हात्रे याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं असून विहान मल्होत्रा उपकर्णधार म्हणून संघात असेल. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीलाही संघात संधी देण्यात आली आहे.
भारतीय अंडर-19 संघाचा पहिला सामना 15 जानेवारी रोजी अमेरिकेविरुद्ध होणार आहे. आगामी विश्वचषकात भारताचा समावेश ग्रुप A मध्ये करण्यात आला असून या गटात अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार असून त्यातून विश्वविजेता निश्चित होईल. टीम इंडिया त्यांचे सर्व ग्रुप स्टेज सामने झिम्बाब्वेच्या बुलावायो स्टेडियमवर खेळणार आहे.
टीम इंडियाचे साखळी फेरीतील सामने:
* भारत विरुद्ध अमेरिका – 15 जानेवारी, बुलावायो
* भारत विरुद्ध बांगलादेश – 17 जानेवारी, बुलावायो
* भारत विरुद्ध न्यूझीलंड – 24 जानेवारी, बुलावायो
मुंबईकर आयुष म्हात्रे याच्याकडे यापूर्वीही विविध दौऱ्यांमध्ये भारतीय अंडर-19 संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्रभावी कामगिरी करत अलीकडेच अंडर-19 आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र ट्रॉफी जिंकता आली नव्हती.
या विश्वचषकात सर्वाधिक चर्चा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याची आहे. त्याची ही पहिलीच आयसीसी स्पर्धा असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. भारताने आतापर्यंत पाच वेळा (2000, 2008, 2012, 2018 आणि 2022) आयसीसी अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. मागील स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंग, आर. एस. अंबरिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, मोहम्मद अनन, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.

