(मुंबई)
‘कुछ खास है हम सभी में’, ‘ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं’ अशा बहुचर्चित जाहिरातींचे जनक, भारतीय जाहिरात क्षेत्रातील प्रख्यात सर्जक पीयूष पांडे यांचे शुक्रवारी पहाटे ५.५० वाजता एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. पार्थिवावर आज शनिवारी सकाळी दादर, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
भारतीय जाहिरात उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या पीयूष पांडे यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ अनेक नामांकित ब्रँडसाठी अफलातून संकल्पनांच्या जाहिराती तयार केल्या. त्यांच्या कल्पकतेमुळे ‘फेविकॉल’, ‘कॅडबरी’, ‘एशियन पेंट्स’ अशा अनेक जाहिराती प्रेक्षकांच्या आवडीस उतरल्या आणि भारतीय जाहिरात क्षेत्र कायम बदलले.
भारतीय जाहिरात उद्योगाचे पितामह म्हणून ओळखले जाणारे पांडे आजही ‘ओगल्वी इंडिया’ या नामांकित कंपनीशी सल्लागार म्हणून जोडलेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी नीता पांडे, भाऊ प्रसून पांडे आणि बहीण इला अरुण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, रवीना टंडन, प्रसून जोशी आणि जाहिरात क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
मूळचे जयपूरचे पीयूष पांडे क्रिकेटपटू म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात करताना अनेक छोटी-मोठी कामे केली. १९८२ साली त्यांनी ब्रिटिश जाहिरात कंपनी ‘ओगल्वी अँड मेथर’ मध्ये सामान्य पदावर प्रवेश केला आणि त्यांच्या सर्जक बुद्धिमत्तेमुळे लवकरच जाहिरात निर्मितीच्या क्षेत्रात नाव कमावले. पुढे ते ‘ओगल्वी इंडिया’मध्ये सर्वोच्च पदावर पोहोचले आणि २०२३ मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले.
त्यांच्या जाहिरातींमध्ये हिंदीवर भर दिला जात असे, रोजच्या आयुष्यातील लहान विसंगतींवर आधारित कल्पक जाहिराती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. ‘फेविकॉल’च्या गमतीशीर जाहिराती, ‘कॅडबरी’ची मोहक जाहिरात आणि ‘हर खुशी में रंग लाए’ या एशियन पेंट्सची जाहिरात आजही लक्षात राहतात, ज्यामुळे त्यांनी जाहिरात विश्वाचे स्वरूप बदलले.
त्यांच्या हजारो कामांमध्ये एक जाहिरात आजही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणते …ती म्हणजे 1994 साली प्रदर्शित झालेली कॅडबरी डेअरी मिल्क’ची जाहिरात. क्रिकेटच्या मैदानात एक तरुण मुलगी उत्साहाच्या भरात धावत जाते आणि आनंदाने नाचू लागते! सुरक्षा रक्षक तिला थांबवायचा प्रयत्न करतात, पण ती त्यांना चुकवून आनंदात गरगर फिरते, कारण तिच्या आवडत्या खेळाडूने सिक्सर मारलेला असतो. पडद्यावर शब्द येतात “असली स्वाद जिंदगी का.”
ही जाहिरात नुसती एक टीव्ही कमर्शिअल नव्हती; तो एक जल्लोषाचा क्षण होता. आणि या क्षणामागची कल्पना होती पियूष पांडे यांची, एका बोर्डिंग पासवर लिहिलेली गाण्याची धून आणि ती सहजपणे नाचणारी मुलगी शिमोनाराशी. त्यावेळी ‘सोशल मीडिया’ नव्हता, तरी ही मुलगी रातोरात ‘स्टार’ बनली होती!

