( रत्नागिरी / प्रतिनिधी )
थिबा राजा कालीन बुद्धविहारासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर प्रशासनाकडून सुरु असलेल्या कम्युनिटी सेंटरच्या बांधकाम प्रक्रियेचा तात्काळ रद्दबातल निर्णय घ्यावा, तसेच विहाराची मूळ राखीव नोंद पुनर्स्थापित करून ती जागा बौद्ध समाजाकडे सुपूर्द करावी, या मागण्यांसाठी रत्नागिरीत 27 ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती थिबा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार व कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी सांगितले की, मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता थिबा कालीन बुद्धविहारापासून होईल. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान करेल. या मोर्चात सुमारे पाच हजार बौद्ध बांधव सहभागी होणार असून, जिल्ह्यातील विविध गावांतून यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावंत पुढे म्हणाले, थिबा राजा कालीन बुद्धविहार इंग्रज सरकारने राजा थिबांच्या इच्छेनुसार बांधून दिला होता. या विहारामुळे रत्नागिरी ही भूमी बौद्ध संस्कृतीने पावन झाली आहे. समाजबांधव गेल्या अनेक वर्षांपासून या स्थळाची निगा राखत आहेत. शासनाच्या नोंदीनुसार 2014 साली या विहाराच्या खालील 17.50 गुंठे क्षेत्र बौद्ध समाजासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, या आरक्षित भूमीत प्रशासनाकडून कम्युनिटी सेंटरचे बांधकाम सुरू करण्यात येत असून, हे शासनाच्या आदेशाला विरोधात असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. बौद्ध विहारासाठी राखीव जागेचा अन्य हेतूसाठी वापर करणे म्हणजे धर्मस्थळाचा अवमान व बौद्ध समाजावर अन्याय असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “कम्युनिटी सेंटरसाठी बौद्ध समाजाचा विरोध नाही; मात्र हे बांधकाम ऐतिहासिक आणि विशिष्ट कारणासाठी राखून ठेवलेल्या बौद्ध विहाराच्या भूमीत होऊ नये. प्रशासनाच्या या समाजविरोधी धोरणाविरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे उपाध्यक्ष किशोर पवार, प्रकाश पवार, सल्लागार सुनील आंबुलकर, दीपक जाधव, सहसचिव रुपेश कांबळे आणि प्रसिद्धी प्रमुख केतन पवार आदी उपस्थित होते.

