(ठाणे)
डोंबिवलीजवळील पलावा सिटी परिसरातील देसाई खाडी किनारी सापडलेल्या सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत वेगवान तपास करून उलगडा केला आहे. तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले असून, ही हत्या मृत तरुणीच्या लिव्ह-इन पार्टनरनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्रियंका विश्वकर्मा (वय अंदाजे २५) असून, तिचा खून करणारा आरोपी तिचाच लिव्ह-इन पार्टनर विनोद विश्वकर्मा आहे. दोघेही काही महिन्यांपासून एकत्र राहत होते.
वादातून हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये
तपासात उघड झाले की, किरकोळ वादातून रागाच्या भरात विनोदने प्रियंकाचा गळा दाबून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह मोठ्या सुटकेसमध्ये भरून पलावा सिटीजवळील देसाई खाडीत फेकून दिला. मृतदेह नेऊन टाकताना विनोद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसला होता. याच निर्णायक धाग्याच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध लावला. कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या पलावा येथील देसाई खाडीच्या उड्डाण पुलावरून वाहनांची २४ तास वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत मारेकऱ्यांनी सुटकेसमध्ये भरलेला तरूणीचा मृतदेह खाडी पात्रात फेकून देण्याचे धाडस केले केले होते.
काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांच्या नजरेस एक बेवारस सुटकेस आली. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. सुटकेस उघडली असता त्यात एका तरुणीचा मृतदेह सापडला आणि परिसरात भीती पसरली. प्रारंभी पोलिसांनी हे अज्ञात व्यक्तींनी केलेले निर्घृण हत्याकांड असावे असा अंदाज व्यक्त केला होता.
डायघर पोलिसांनी मृतदेहाजवळील पुरावे, आसपासचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत तपास जलद गतीने सुरू केला. यामुळे काही तासांतच आरोपी विनोद विश्वकर्मा ओळख पटली आणि त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा फक्त १२ तासांत उलगडा करून आरोपीला अटक केली. या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

