(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दिवाळीचा उत्साह ओसरताच सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत तब्बल ५५ हजारांहून अधिक भाविक व पर्यटकांनी ‘श्री’ गणपतीचे दर्शन घेतले. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे गणपतीपुळे व आसपासच्या किनारी भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली असून, स्थानिक प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.
दिवाळीनिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने, तीर्थदर्शनासोबतच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील तसेच परराज्यातील पर्यटकांनी कोकण गाठले आहे. हिवाळा अजून सुरू झाला नसला तरी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून, समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या चार दिवसांत वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, काजीरभाटी व आरेवारे बीच पर्यटकांनी फुलून गेले आहेत. सकाळ-संध्याकाळ समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी उसळत असून, आरेवारे परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
गणपतीपुळे येथे ‘श्रीं’ चे दर्शन घेतल्यानंतर भाविक समुद्रस्नान, वॉटर स्पोर्ट्स, घोडेसवारी, उंट सवारी अशा विविध उपक्रमांचा आनंद घेत आहेत. मात्र, “समुद्रात खोलवर जाऊ नका” या चेतावणीचा अनेक पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
हॉटेल-लॉजिंग व्यवसायाला सुगीचे दिवस
पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता हॉटेल, लॉजिंग, होमस्टे आणि एमटीडीसी निवास केंद्रांना सुगीचे दिवस आले आहेत. गणपतीपुळे, नेवरे, मालगुंड, वरवडे परिसरातील निवासस्थाने हाऊसफुल्ल झाली असून, गर्दी टाळण्यासाठी काही पर्यटक शांत किनारी गावे निवडत आहेत.
कोकणी खाद्यसंस्कृतीला पर्यटकांची पसंती
पर्यटकांच्या पसंतीस कोकणी खाद्यपदार्थांनी विशेष स्थान मिळवले आहे. मांसाहारी पर्यटकांकडून ताज्या माशांच्या पदार्थांना वाढती मागणी आहे, तर शाकाहारी जेवणात खास कोकणी थाळी आणि उकडीचे मोदक चवदार आकर्षण ठरत आहेत.
वाहतूक कोंडीचे संकट गडद
गणपतीपुळे प्रवेशद्वारावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहनांची नोंदणी झाल्यानंतरच प्रवेश दिला जात असल्याने प्रवाशांचा प्रवास किचकट होत आहे. वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असून, स्थानिक प्रशासनाकडून तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर सध्या दिवाळी सुट्टीचा रंग चढला असला, तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हे आगामी काही दिवसांतले मोठे आव्हान ठरणार आहे.

