दरवर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांचे नवनवीन ट्रेंड समोर येतात त्यामध्ये चकरी, रॉकेट, फुलबाज्या अशा पारंपरिक फटाक्यांपासून ते आधुनिक सजावटीपर्यंत फटाक्यांचा समावेश असतो. मात्र, यंदा असा एक ट्रेंड समोर आला आहे जो अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. देशभरात ‘कार्बाइड गन’ किंवा ‘देशी बंदूक’ या नावाने ओळखला जाणारा हा नवा खेळण्याचा प्रकार धोक्याचा बनला असून, अनेक मुले व तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
देशभरात दिवाळीचा जल्लोष असतानाच मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. फक्त १५० ते २०० रुपयांच्या ‘कॅल्शियम कार्बाइड गन’ या घातक खेळण्यामुळे अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे. या गनच्या स्फोटांमुळे आतापर्यंत १२५ हून अधिक मुले आणि तरुण जखमी झाले असून, अनेकांचा दृष्टीवर परिणाम झाला आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी बहुतेक वयोगट ८ ते १४ वर्षे इतका असून, काही प्रकरणांमध्ये ७ ते ३५ वर्षांपर्यंतचे तरुणही बाधित झाले आहेत. जवळपास २० ते ३० टक्के प्रकरणांमध्ये डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे आढळले आहे. काही रुग्णांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज भासत आहे, तर काहींना कॉर्निया ट्रान्सप्लांट करावा लागू शकतो.
ही बंदूक अतिशय साध्या सामग्रीपासून बनवली जाते — गॅस लायटर, प्लास्टिक पाईप आणि सहज मिळणारे कॅल्शियम कार्बाइड. पाईपमध्ये भरलेले कार्बाइड पाण्यात मिसळताच ‘ॲसिटिलीन गॅस’ तयार होतो. त्यावर एक छोटीशी ठिणगी उडताच जोरदार स्फोट होतो. त्यामुळे पाईपचे छोटे तुकडे वेगाने बाहेर फेकले जातात आणि थेट डोळ्यांवर किंवा चेहऱ्यावर आदळतात, ज्यामुळे गंभीर इजा होऊ शकते. या उपकरणामुळे थेड डोळ्यांना इजा होते. स्फोटामधून धातूचे कण आणि कार्बाइडची वाफ बाहेर पडते, ज्यामुळे रेटिना जळून जातो. आम्ही अशा अनेक रुग्णांवर उपचार करत आहोत, ज्यामध्ये मुलांच्या डोळ्यांतील बाहुल्यांना जखम झाली आहे, ज्यामुळे त्यांना कायमचे अंधत्व आले आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियावर ‘कार्बाइड गन’चे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ही धोकादायक गन मुलांमध्ये “नवीन दिवाळी ट्रेंड” म्हणून पसरत आहे. धोका माहित नसल्याने दुकानदारांनीही या गनची खुलेआम विक्री सुरू केली आहे. काही ठिकाणी तर या गन घरी बनवल्या जात आहेत.
मुले गनच्या नळीमध्ये पाहताना स्फोट होऊन अपघात घडत आहेत. या धोकादायक ट्रेंडला इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स मधून मोठी प्रसिद्धी मिळताना पाहायला मिळते. याचे ‘फायरक्रॅकर गन चॅलेंज’ म्हणून टॅग केलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे तरूण लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात ही कार्बाईड गन वापरताना दिसत आहेत. देशभरात अशा घटनांची मालिका वाढत असून, तज्ञांनी ही “कॅल्शियम कार्बाइड गन” अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा सोशल मीडियावर या गनचे व्हिडिओ अजूनही वेगाने प्रसारित होत आहेत, ज्यामुळे पालक आणि प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

