(मुंबई)
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा प्रमुख विषय ठरलेले ठाकरे घराण्याचे दोन बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊबीजेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मराठीच्या प्रश्नावरून दोघे एकत्र आल्यापासून त्यांच्या भेटीगाठींना वेग आला असून, यामुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी दीपोत्सवा निमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, यांसह ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. त्यावेळी, दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राला पाहायला मिळाले. त्यामुळेच, आता ठाकरे बंधुच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची वाट अवघा महाराष्ट्र पाहत आहे.
मराठी भाषेच्या प्रश्नावर आणि शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. जनतेच्या विरोधाला आणि ठाकरे बंधूंच्या दबावाला सरकारला झुकावे लागले आणि हिंदी सक्तीचा जीआर मागे घेण्यात आला. त्या घटनेनंतर दोन्ही बंधूंच्या भेटी वाढत असून, काल भाऊबीजच्या निमित्ताने झालेली त्यांची भेट ही गेल्या चार महिन्यांतील नववी भेट असल्याचे सांगितले जाते.
दिवाळीच्या उत्साहात चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. जयजयवंती यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचे औक्षण करून भावबंधनाचा सण साजरा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य आणि तेजस तसेच राज ठाकरे यांचा पुत्र अमित आणि कन्या उर्वशी यांनीही एकत्र येऊन भाऊबीज साजरी केली. उर्वशी ठाकरे हिने सर्व भावांचे औक्षण केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जयजयवंती ठाकरे यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, “आज दोन्ही भाऊ एकत्र घरी आले, हीच खरी दिवाळी आहे.” माझ्यासाठी ही भाऊबीज खूप स्पेशल होती, कारण भावाने घरी येणं हीच त्यांच्यासाठी मोठी भेट आहे, असे त्यांनी नमूद केले.
या भेटीनंतर पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांमध्येही “उबाठा-मनसे” युतीबद्दल उत्साह दिसून येत असून, आगामी महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती अधिकृतपणे जाहीर होणार, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, दोन ठाकरे बंधूंच्या भेटीवर सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “ही ठाकरे कुटुंबातील वैयक्तिक आणि घरगुती भेट आहे. दोन भाऊ भेटत असतील, तर त्यात राजकारण आणू नये. त्यावर भाष्य करणे योग्य नाही,” असे मत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. या भेटीनंतर ठाकरे घराण्यातील भाऊबीजचा सणच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही नव्या घडामोडींचे संकेत मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

