आपल्या हिंदू धर्मबांधवाना एका सुनियोजित षडयंत्राद्वारे विविध आमीषे दाखवून, भुलथापा देऊन, त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा गैरफायदा घेऊन, सनातन हिंदुधर्माबाबत अपप्रचार करून व अनेकदा धमकावून त्यांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे आजवर सनातन हिंदु धर्माची अपरिमित हानी झालेली आहे. पण अशा धर्मांतरित हिंदूंना उपरती होऊन पुन्हा हिंदुधर्मात येण्याची इच्छा असते. अशा हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्या कुटुंबांना पुन्हा विधिवत धर्मप्रवेश देण्याचे महाअभियान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात आहे.
असाच एक सोहळा शुक्रवारी शिरसाड(वसई) येथे झाला. यावेळी ५०६ कुटुंबांनी स्वधर्मात घर वापसी केली आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आतापर्यंत १,५१,२७८ कुटुंबियांची हिंदू धर्मात घर वापसी करण्यात आली आह समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे. या कार्यक्रमासाठी पालघर विधानसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रमेश ओझे उपस्थित होते. या सोहळ्यात पालघर, नाशिक तसेच गुजरातमधील धर्मांतरीत कुटुंबांना विधिवत हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. तीन तास हा विधी सुरू होता. त्यात गोमाता पूजन, होम हवन असे विधी झाले. या सर्व बांधवांना शपथ देण्यात आली.
जगद्गुरुश्रींनी ही शपथ दिली ती अशी – यापुढे मी हिंदू धर्माची उपासना, रितीरिवाज प्रथा परंपरा यांचे तंतोतंत पालन करेन. यापुढे मी धन्य धर्मात जाणार नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणून जगेन. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले,” मिशनरी वेगवेगळ्या प्रकारची अमीषे दाखवून हिंदू धर्मीय लोकांचा बाप्तिस्मा करतात. त्यांचे धर्मातर करून घेत आहेत. त्यातील बरीचशी मंडळी आदिवासी विभागातील आहेत. त्याच्या बोलीभाषेत तेल पाणी म्हणजे बाप्तिस्मा करून त्यांचे धर्मपरिवर्तन करतात. त्यांचे मुळचे नाव बदलत नाहीत. तसेच त्यांची जात आणि धर्म आदिवासी सोयीसुविधा मिळण्यासाठी न बदलता त्यांचे ख्रिश्चनीकरण करण्याचे काम सुरू आहे. या गोष्टीला आळा बसावा, तसेच ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते ते आम्हाला येऊन भेटले. म्हणून आम्ही आता त्यांना पूर्वीची उपासनापध्दती सूरु करून दिली आहे. आज ५०६ कुटुंबांनी घरवापसी केलेली आहे. आजवर १,५१,२७८ लोकांना आम्ही पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे.