(नाशिक)
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात मोठी आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथक (SIT)ने कर्मयोगी नगर येथील खरातच्या बंगल्यावर धडक कारवाई करत त्याचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतले, तर पत्नी कल्पना खरात ही कारवाईपूर्वीच फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बंगल्याचे गेट ठोठावले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेजारील बंगल्याच्या भिंतीवरून उडी मारत परिसरात प्रवेश केला. त्यानंतर घर आणि परिसराची सखोल झडती घेण्यात आली, मात्र कल्पना खरात आढळून आली नाही. तिचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
या कारवाईदरम्यान बंगल्यात महत्त्वाची व्यक्ती न सापडल्याने अखेर पोलिसांनी हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसला तरी तपासाच्या दृष्टीने त्याची चौकशी सुरू आहे. पुढील तपासासाठी त्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे नेण्यात आले आहे. दरम्यान, भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातवर भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर तपासाला वेग आला असून अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.
तपासादरम्यान आता एक नवा संशय समोर आला आहे. महिलांना जाळ्यात ओढताना त्यांना नकळत काही औषधे देण्यात येत होती का, याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. खरातच्या मोबाइलमधील संपर्कांची तपासणी सुरू असून, औषधांच्या खरेदी-विक्रीचे रेकॉर्डही तपासले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार वैद्यकीय क्षेत्रापर्यंत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि इतर काही जणांविरोधात शिर्डी येथे जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. चार एकर जमिनीच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार असून, कर्जाच्या बहाण्याने जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आधीच काही आरोपी ताब्यात असून, कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. तपासात असेही समोर आले आहे की, खरात विविध उद्देशांसाठी चार वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करत होता. महिलांशी संपर्क, प्रभावशाली व्यक्तींशी संवाद, आर्थिक व्यवहार आणि सामान्य संपर्क यासाठी स्वतंत्र सिमचा वापर केल्याने त्याने आपले जाळे अधिक मजबूत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
एसआयटीच्या तपासात भोंदू अशोक खरातने कोट्यवधींची संपत्ती कमवल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार, अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत 3 बीएचके फ्लॅट आहे. 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत सातव्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा हा आलिशान फ्लॅट आहे. हे घर 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आलेले आहे. खरातने संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख स्वरूपात दिल्याची माहिती समोर आली आहे. इतरही आणखी काही शहरांमध्ये खरातची मालमत्ता आहे.
सध्या पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत संपत आली असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपासाचा वेग वाढवण्यात आला असून, कुटुंबीय, मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि वैद्यकीय संबंध या सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.

