(पनवेल)
पनवेल तालुक्यातील जावळे गावात एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले, त्यापैकी २२ वर्षीय संतोष बिरा लूहार याचा मृत्यू झाला असून उरलेल्या चौघांवर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण केली आहे. उलवा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबातील सदस्यांनी चहा मधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मागील दोन ते तीन दिवस घराचा दरवाजा उघडला नव्हता, त्यामुळे शेजारी काहीतरी चुकीचे झाल्याचा संशय बाळगून अग्निशमन दल आणि पोलीसांना माहिती दिली. सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी घराचा दरवाजा उघडला आणि पाचही जण बेशुद्ध अवस्थेत सापडले.
तातडीने सर्वांना पनवेलमधील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. २२ वर्षीय संतोष बिरा लूहार मृतावस्थेत सापडला, तर २३ वर्षीय रमेश बिरा लोहार, त्यांची पत्नी बसंती आणि दोन लहान मुले आयुष (५) व आर्यन (२) बेशुद्ध असल्यामुळे त्यांचे उपचार सुरू आहेत. अत्यावश्यक उपचारासाठी हे चारही रुग्ण नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
दोन्ही लहान मुलांची प्रकृती स्थिर असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत आणि कुटुंबाच्या इतर परिस्थितीचा अभ्यास सुरू आहे.

