(नवी दिल्ली)
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी निवेदन जारी करत चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाने जनता, राजकीय पक्ष, सशस्त्र दल आणि सरकार यांना एकत्र येऊन संयम आणि एकजुटीने या संकटाचा सामना करण्याचे आवाहन केले आहे. “युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही,” असे ठाम मत त्यांनी मांडले आहे.
बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढता तणाव आमच्यासाठी गंभीर चिंता निर्माण करणारा आहे. राष्ट्र आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचलल्या जाणाऱ्या सर्व आवश्यक उपाययोजनांना आमचा पाठिंबा आहे. या कठीण काळात सर्व घटकांनी एकत्र येऊन संयमाने व एकजुटीने संकटाचा सामना करावा.”
बोर्डाने दहशतवादाचा तीव्र निषेध करत म्हटले आहे की, “दहशतवाद आणि निष्पाप नागरिकांची हत्या ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. इस्लामिक शिकवणी, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तत्त्वे व मानवी मूल्यांमध्ये दहशतवादाला कुठलाही वाव नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्न शांततापूर्ण संवाद व चर्चा यांद्वारेच सोडवावेत.” त्यांनी हेही अधोरेखित केले की, अण्वस्त्र असलेल्या देशांमध्ये युद्ध परवडणारे नसते.
यासोबतच वक्फ कायद्याच्या अनुषंगाने देखील बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘वक्फ वाचवा’ मोहीम पूर्वीप्रमाणे सुरूच राहील, मात्र सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १६ मेपर्यंतचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि मेळावे पुढे ढकलण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, गोलमेज चर्चा, आंतरधर्मीय संवाद, मशिदींमधील प्रवचने, जिल्हाधिकारीमार्फत निवेदन सादरीकरण आणि पत्रकार परिषदा हे अंतर्गत कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील. बोर्डाने आशा व्यक्त केली आहे की, सध्याचे तणावपूर्ण वातावरण लवकरच शांत होईल आणि देश पुन्हा सामान्य स्थितीत परत येईल.