(गुहागर / वार्ताहर)
हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषी विभाग आणि ग्रामपंचायत उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बचत गटांच्या माध्यमातून तब्बल १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा अभिनव व यशस्वी प्रयोग सुरू करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे, नेत्राताई ठाकूर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले, गौरव वेल्हाळ, मानसी रांगळे तसेच उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषिदिनानिमित्त ग्रामपंचायत हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. आधुनिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना ‘गोकृपा अमृतम्’ तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी उपसभापती निलेश सुर्वे आणि जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करत शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
याच वेळी गावातील बचत गटांच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेती उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाचणी आणि विविध फळभाजी पिकांची लागवड करण्यात येणार असून, ग्रामीण भागात सामूहिक शेतीचा आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रयोग मानला जात आहे.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, कृषी अधिकारी कृष्णदेव कदम, मंडळ कृषी अधिकारी नाले, सर्जेराव कांबळे, मंगेश पिंगळे, विस्तार अधिकारी प्रतीक जाधव, कृषी पर्यवेक्षक कुसाळकर तसेच तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय अनिल पवार, भिकू मालप, शांताराम गोरीवले, संदीप गावणंग, विनायक कदम, नारायण गावणंग, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णा गोरीवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी केली, तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश लेंडवे यांनी केले. कृषिदिनानिमित्त आयोजित या उपक्रमाला शेतकरी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

