(गुहागर / सचिन कुळये)
गुहागर तालुक्यातील पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १६ व १७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, कुडली क्रमांक १ यांना लाभले आहे.
या स्पर्धेत पडवे उर्दू केंद्रातील सर्व शाळांचा उत्स्फूर्त सहभाग असून विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवत आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुडली गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच शिक्षकवृंद यांनी उत्कृष्ट नियोजन केले असून, बाहेरून आलेल्या क्रीडाप्रेमींचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी येथील शिक्षणप्रेमी पालक, ग्रामस्थ आणि महिला मंडळांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. बालवयात क्रीडा संस्कार रुजावेत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने सर्व स्तरांतून मिळालेला पाठिंबा कौतुकास्पद आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत विविध रोमांचक सामने होत असून, पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचा ‘चॅम्पियन’ कोणती शाळा ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

