(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्याचा अभिमान वाढवणारी आनंदवार्ता समोर आली आहे. इंडियन नेव्ही तर्फे आयोजित प्रतिष्ठित OSD – Overseas Deployment या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑपरेशनल एक्सरसाईज शिबिरासाठी CC मयुराज टक्के याची देशातील सर्वोत्तम कॅडेट म्हणून निवड झाली आहे. या शिबिरात भारतासह केनिया, साऊथ आफ्रिका, मोझाम्बिक आणि टांझानिया या देशांतील नौदल दल सहभागी होत आहेत.
मयुराज टक्के हा संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील ओझरे खुर्द (तळवडे) येथील रहिवासी आहे. त्याचे वडिल भरत टक्के सेंटरिंगचे काम करतात, तर आजोबा विष्णू टक्के हे ओझरे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. या कुटुंबातील मयुराज याने आपल्या चिकाटी, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
OSD (Overseas Deployment) हा भारतीय नौदलाचा अत्यंत प्रतिष्ठित आणि दुर्मिळ संधी देणारा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. या अंतर्गत निवडक NCC कॅडेट्सना भारतीय नौदलाच्या जहाजावर प्रत्यक्ष प्रशिक्षण, तसेच परदेशी नौदलांशी अनुभव आणि संस्कृतीची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. या कार्यक्रमामुळे कॅडेट्सना जागतिक स्तरावर सैनिकी शिस्त, नेतृत्वगुण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा अनमोल अनुभव मिळतो.
देशभरातून निवड झालेल्या सर्वोत्तम NCC कॅडेट्समधून मयुराज टक्के हा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे, ही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब आहे. यापूर्वीही मयुराज याने ऑल इंडिया नोसैनिक कॅम्प आणि नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धा यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
त्याच्या या यशामुळे देवरुख परिसरात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक ग्रामस्थ आणि शिक्षक वर्गाकडून मयुराजचे कौतुक होत आहे.

